नमस्कार

माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...



त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...







Monday, April 11, 2011

दुसर्‍या स्वातंत्र्याची लढाई

अखेर सरकार झुकले. अण्णा हजारे नावाच्या एका सर्वसामान्य खेडुताने दिल्ली गदगदा हलवली. गांधीजींच्या उपोषणाच्या अहिंसात्मक मार्गाने अण्णांनी अवघ्या चार दिवसांत देशात एक वादळ उठवले. आजवर समाजातील सर्वसामान्यांपासून कोसों दूर राहिलेले बुद्धिजीवी आणि या देशाची सर्वसामान्य कष्टकरी जनता यांच्यातील दुवा अण्णा ठरले हे या आंदोलनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मात्र, या आंदोलनाच्या यशानंतर अण्णांनी जी पुढील दिशा ठरवली आहे, त्याबाबत मात्र काही प्रश्न उपस्थित होतात. लोकपाल विधेयकासाठी हे आंदोलन असले, तरी त्याला पुढील काळात व्यापक देशव्यापी रूप देण्याचा निर्धार अण्णांनी बोलून दाखविला आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असेल असे ते म्हणाले. त्याची एक मोघम रूपरेषाही त्यांनी उपोषण सोडल्यानंतरच्या आपल्या भाषणामध्ये सांगितली. लोकपाल विधेयकाचा मसुदा बनल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्यासाठी आणि ती मिळाल्यानंतर संसदेची मंजुरी मिळण्यासाठी जरूर भासल्यास आपण पुन्हा आंदोलन करू हे तर अण्णांनी सांगितलेच, त्याचबरोबर इतर अनेक व्यापक मुद्द्यांना त्यांनी त्या भाषणात स्पर्श केला. ग्रामसभा, पालिका सभांना अकार्यक्षम, भ्रष्ट लोकप्रतिनिधींस माघारी बोलावण्याचा अधिकार, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांत सर्वच उमेदवारांबाबत मतदारांत नापसंती असेल तर ती नापसंती दर्शवण्याचा अधिकार, तशी नापसंती बहुसंख्येने दर्शवली गेली, तर निवडणूकच रद्दबातल ठरवली जावी अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह अण्णांनी केला. देशाची निवडणूक व्यवस्थाच बदलली जावी, मतदानयंत्रांऐवजी अन्य पद्धतीने मतदान घेतले जावे वगैरे अनेक गोष्टी ते बोलले आणि अशा मागण्या धसास लावण्यासाठी प्रत्येक राज्यात शुद्ध विचार, शुद्ध आचार व निष्कलंक चारित्र्याच्या व्यक्तींचे संघटन करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला. भ्रष्टाचारमुक्त, समस्यामुक्त भारताचे स्वप्न आजवर अनेकांनी दाखवले, परंतु नंतरच्या काळामध्ये त्या चळवळीच्या शिड्या चढून आलेल्यांनीच वाममार्ग धरला हा या देशाचा आजवरचा इतिहास आहे. गांधीजींपासून जयप्रकाश नारायणांपर्यंतच्या चळवळींच्या बाबतीत हेच तर घडले. आजच्या संदर्भात बोलायचे तर देशापुढील समस्यांच्या निराकरणासाठी बुद्धिवाद्यांपासून आध्यात्मिक गुरूंपर्यंत अनेकांनी व्यापक सामाजिक चळवळींचे सूतोवाच केले. भावनिकदृष्ट्या या देशाच्या आम जनतेला अशा चळवळी साद घालत असल्या, तरी प्रत्यक्षात त्यामधून भ्रष्टाचारमुक्त, कार्यक्षम भारताचे सुंदर स्वप्न साकारेलच असा विश्‍वास मात्र कोणीही छातीठोकपणे व्यक्त करण्यास धजावत नाही. याचे मूलभूत कारण म्हणजे या आंदोलनांची जी दिशा आखली जाते ती भावनिकदृष्ट्या सुखदायक असली, तरी त्या गोष्टींची व्यवहार्यता तपासली गेलेली असतेच असे नाही. त्यामुुळे स्वप्ने ही केवळ स्वप्नेच राहतात आणि उलट त्यांचा चुराडा झालेलाच अधिक दृष्टीस पडतो. शेवटी कोणतीही चळवळ म्हटली की ती एकखांबी असू शकत नाही. नाना वृत्ती - प्रवृत्तीची माणसे तिच्याशी जोडली जात असतात. तो लोंढा थोपवणे मग त्या चळवळीच्या उद्गात्याच्याही हाती राहात नाही. त्यातली स्वार्थांध, सत्तांध माणसे त्यांच्या वृत्तीनुसार पायथ्यापासून शिखरापर्यंत जाण्यासाठी धडपडू लागतात. त्या संघर्षात मूळचे स्वप्न कुठल्याकुठे फेकले जाते. अण्णांच्या आंदोलनात सामील झालेल्यांपैकी तळमळीचे कार्यकर्ते किती आणि समोरच्या कॅमेर्‍यांमुळे आलेले किती हेही येणारा काळ सांगेल. परिवर्तन, क्रांती, नवनिर्माण हे शब्द उच्चारायला छान असतील, परंतु ती ताकद अशा चळवळींमध्ये निर्माण होण्याआधीच त्यांची वाताहत झालेली दिसते ही शोकांतिका आहे. अशी वाताहत होऊ द्यायची नसेल तर त्यासाठी निःस्वार्थी नेतृत्व, निःस्वार्थी कार्यकर्ते, बळकट संघटन हे तर हवेच, परंतु डोळ्यांपुढे जे स्वप्न ठेवले आहे, ते साकारण्याचा जो मार्ग आखलेला आहे, तोही व्यवहार्य हवा. आपल्या आवाक्यातील हवा. सर्व व्यवस्थाच नाकारणे आणि नवी व्यवस्था उभारणे हा काही उपाय होऊ शकत नाही. आपल्या संविधानात्मक लोकशाही व्यवस्थेतील पळवाटा दूर सारून अधिक पारदर्शकता आणणे आणि तिचा गैरफायदा घेणार्‍यांवर अंकुश ठेवणे एवढे केले तरी खूप होईल.

0 आपली प्रतिक्रिया:


राष्ट्रपतींसमवेत गोव्यातील इतर दैनिकांच्या संपादकांसमवेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP