पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिकांचा वावर वाढल्याच्या भारताच्या दाव्यास अमेरिकेनेही पुष्टी दिल्याने आपल्यासाठी ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. गेल्या काही वर्षांत चीन आणि पाकिस्तान यामध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध प्रस्थापित होत गेले आहेत आणि चीन पाकिस्तानला आण्विक, लष्करी तंत्रज्ञानाचा सातत्याने मुबलक पुरवठा करीत आले आहे. एकीकडे भारत आणि अमेरिका संबंध झपाट्याने सुधारत असताना दुसरीकडे पाकिस्तान - चीन एकमेकांच्या निकट येणे हा चीनच्या मुत्सद्देगिरीचा भाग म्हणायला हवा. आपल्या आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा भारतच आहे हे जाणलेल्या चीनने पाकिस्तानला चुचकारण्याचे जोरदार प्रयत्न चालविलेले दिसतात. गेल्या डिसेंबरमध्ये चीनचे पंतप्रधान वॅन जिआबाओ हे पाकिस्तान दौर्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी येत्या तीन वर्षांत चीन पाकिस्तानमध्ये वीस अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. उभय देशांमधील खासगी व्यापार पंधरा अब्ज डॉलरपर्यंत जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. महापुरांनी डळमळीत झालेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला मोठा आधार चीननेच पुरवला. २२९ दशलक्ष डॉलरची देणगी चीनने पूरग्रस्त पाकला दिली आणि चारशे दशलक्ष डॉलरचे सवलतीच्या दरातील कर्जही दिले होते. उभय देशांमधल्या राजनैतिक संबंधांना यंदा तर साठ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे हे वर्ष ‘मैत्री वर्ष’ म्हणून ते साजरे करीत आहेत. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानदरम्यान या वर्षी मोठ्या प्रमाणावर करारमदार झाले तर आश्चर्य वाटू नये. जगातील दुसरी सर्वांत मोठी बँक असलेल्या कमर्शियल बँक ऑफ चायनाच्या शाखा लवकरच पाकिस्तानमध्ये उघडल्या जाणार आहेत. व्यापारी संबंधांना चालना देण्याचे सूतोवाच तर चीनच्या पंतप्रधानांनी गेल्या डिसेंबरमधील पाक भेटीत केले आहेच. परंतु हे सहकार्य केवळ व्यापारी स्वरूपाचे असते तर भारताला त्याची विशेष दखल घेण्याचे कारण नव्हते. हे संबंध निव्वळ व्यापारी स्वरूपाचे नाहीत. अवकाश संशोधन, सागरी संशोधन, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उभय देशांचे संबंध वाढीस लागले आहेत हे तर आहेच, परंतु पाकला अणुतंत्रज्ञान व लष्करी शस्त्रास्त्रसामुग्री पुरवण्यात चीन आघाडीवर आहे ही भारतासाठी मोठी डोकेदुखी आहे. चीनच्या आण्विक व लष्करी तंत्रज्ञानाची जवळजवळ चाळीस टक्के आयात पाकिस्तान करते हे यासंदर्भात लक्षात घ्यायला हवे. आपली लष्करी आणि आण्विक ताकद पाकिस्तान सातत्याने वाढवत चालले आहे. नुकतीच ‘हताफ- २’ या क्षेपणास्त्राची पाकने चाचणी घेतली. अर्थातच त्यासाठी चीनने तंत्रज्ञान पुरवले हे वेगळे सांगायला नको. क्षेपणास्रे, लढाऊ विमाने, अणुतंत्रज्ञान यामध्ये चीन हा पाकिस्तानचा आधारस्तंभ आहे. ‘शाहीन - १’ ही उभय देशांची लष्करी हवाई कवायत नुकतीच झाली. जपानमधील अणुदुर्घटनेनंतरही चीन पाकिस्तानमध्ये दोन मोठे अणुप्रकल्प उभारून देणार आहे. काराकोरम पर्वतराजींतून जाणारा महामार्ग चीन उभारते आहे. त्याद्वारे चीनचा शिनजियांग प्रांत आणि पाकिस्तान यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. चीनने भारतीय सीमेपलीकडे आपल्या सैनिकी कारवाया वाढीला लावल्या आहेत आणि दुसरीकडे पाकिस्तानला अधिकाधिक अण्वस्त्रसज्ज करून भारतावर वचक प्रस्थापित केला जात आहे. पाकिस्तान हा जगातील पाचवा सर्वांत मोठा अण्वस्त्रसज्ज देश म्हणून ब्रिटनलाही मागे टाकत चालला आहे. खरे तर भारत - पाकिस्तानची जी दोन युद्धे १९६५ आणि ७१ मध्ये झाली, तेव्हा चीनने पाकची साथ दिली नव्हती. कारगीलमध्ये जेव्हा पाकने आगळीक केली, तेव्हाही चीनने भारताची कड घेतली होती. परंतु आता परिस्थिती पालटत चालली आहे. आपली विदेश नीती अधिकाधिक अमेरिकाधार्जिणी बनत असल्याचा परिपाक म्हणून चीन आणि भारत यामध्ये विसंवाद वाढत चालला आहे. हा विसंवाद आणि पाक - चीनदरम्यानचे वाढते संबंध या दोन्ही गोष्टी आपल्या देशासाठी हितकारक नाहीत. अरुणाचल प्रदेश, तिबेटसारखे सलते काटे भारत - चीन संबंधांत आधीच आहेत. आता त्यामध्ये पाकिस्तानचे मीठ चोळले गेले, तर त्यातून एका अशांत पर्वात आपण पाऊल ठेवू.
नमस्कार
माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...
त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...
त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...


0 आपली प्रतिक्रिया:
Post a Comment