नमस्कार

माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...



त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...







Thursday, April 21, 2011

अग्निकांडाचा धडा

जुवारीनगर येथील अग्निकांडामुळे वायूवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा उपस्थित झाला आहे. नाफ्ता हे विशिष्ट प्रकारच्या विविध हायड्रोकार्बनचे द्रवरूप मिश्रण असते. खरे तर अशा प्रकारचे हायड्रोकार्बन वाहून नेणार्‍या वायूवाहिन्या घालताना त्यांच्या सुरक्षिततेविषयीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन काटेकोरपणे केले जाते. या वाहिन्यांचे सांधे वेल्डिंगद्वारे जोडतानादेखील त्यांची पूर्ण रेडिओग्राफिक तपासणी केली जाते. इतकेच नव्हे, तर या वाहिन्यांना कालांतराने गंज चढू नये म्हणून त्यांना कॅथोडिक आवरणही चढवतात. जुवारीनगरातील दुर्घटना घडली, त्यामध्ये वायूवाहिनीच्या सुरक्षात्मक यंत्रणेचा काही दोष असल्याचे दिसत नाही. ती दुर्घटना निव्वळ मानवी चुकीमुळे आणि बेफिकिरीतून झालेली आहे. दुसरी वाहिनी घालण्यासाठी खोदकाम करीत असताना नाफ्तावाहिनीला धक्का लागला आणि त्यातून उच्च दाबाने उसळलेल्या नाफ्त्याने हवेशी संपर्क होताच पेट घेतला असे आढळून आले आहे. त्याचा अर्थ पोकलेन यंत्राद्वारे खोदकाम करीत असताना तेथून जाणार्‍या नाफ्तावाहिनीबाबत संबंधित कंत्राटदार एक तर अनभिज्ञ होता किंवा त्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. जवळचा झुआरी कारखाना गेले काही दिवस बंद असल्याने या दुर्घटनेची तीव्रता वाढली नाही हे सुदैव. प्राणहानी झालेली नसली, तरीही तीसपेक्षा अधिक वाहने जळून खाक होणे हे नुकसानही काही कमी नाही. येथे प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे नव्याने खोदकाम करीत असताना तेथे जमिनीखालून नाफ्ता वाहिनी जाते याची माहिती संंंबंधितांना कशी नव्हती हा. खोदकाम करणार्‍यांपाशी संबंधित जागेचे नकाशे होते, तर त्यामध्ये त्या वाहिनीचा निर्देश नव्हता का? खोदकाम करीत असताना तेथून जाणार्‍या नाफ्तावाहिनीचा धोका या कामावर देखरेख करणार्‍या अधिकार्‍यांस जाणवला नाही हे आश्चर्यकारक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आग लागताच तिला विझवण्याचे तत्परतेने प्रयत्न झाले, तरी नाफ्त्याचे गुणधर्म कोणते, त्यामुळे लागलेली आग विझवण्यासाठी काय करावे लागते, याची पुरेशी माहिती संबंधित अग्निशामक यंत्रणांना होती का, याचीची चौकशी करावी लागेल. मुरगाव बंदरातून ही नाफ्तावाहिनी बायणा, गांधीनगर, वरुणापुरी, मांगोर हिल, दाबोळी या मार्गे जुवारीनगरकडे आणली गेली आहे. यामध्ये गच्च लोकवस्तीचा भागही येतो. काही भागांत राजकारण्यांच्या वरदहस्ताने बेकायदा झोपडपट्टी उभी राहिलेली आहे. नाफ्ता वाहिनी जमिनीखालून साधारणतः एक मीटर खोलीवरून नेली जाते. कोणीही बांधकामासाठी वा अन्य कारणासाठी खोदकाम हाती घेऊ शकतो. अशा वेळी जमिनीखालून जाणार्‍या नाफ्तावाहिनीची पक्की माहिती नसेल, तर दुर्घटना अटळ आहे. नागरी वस्तीमध्ये अशी एखादी दुर्घटना घडली, तर त्यावेळी किती मोठ्या प्रमाणात वित्त व प्राणहानी होईल, याची कल्पनाही करवत नाही. नाफ्त्याची डिझेलमध्ये भेसळ करण्याचे प्रकार सर्रास चालतात. महाराष्ट्रात साडे तीन हजार कोटींची नाफ्ता भेसळ काही वर्षांपूर्वी उजेडात आली होती. फार कशाला, गोव्यातही साकवाळ - जुवारीनगरच्याच परिसरात डिझेलमध्ये नाफ्ता आणि फर्नेस ऑईलची भेसळ उघड झाली होती. पेट्रोलियम पदार्थांत भेसळ करण्यासाठीच खासगी ऊर्जा कंपनीच्या नाफ्ता वाहिनीला फोडून नाफ्ता पळवण्याचा प्रयत्नही काही काळापूर्वी झाला होता. तेव्हाही नाफ्त्याने पेट घेतला होता. त्यामुळे या वाहिनीसंदर्भातील धोका प्रशासनाला ठाऊक नाही अशातला भाग नाही. वास्को हे शहर विविध इंधनांच्या साठवणुकीचे आगर असल्याने जणू एका निद्रिस्त ज्वालामुखीवर वसलेले आहे. शहरातील तेल टाक्यांच्या स्थलांतरानेच शहरावरील टांगती तलवार कमी होईल असे नव्हे. जमिनीखालून गेलेल्या या वायूवाहिन्यांपासून उद्भवू शकणार्‍या धोक्यांचा विचारही प्रशासनाला करावा लागेल. यापुढील काळात गोकाकहून वायूवाहिनी गोव्यात येऊ घातली आहे. उत्तरेकडून येणार्‍या राष्ट्रीय ग्रीडशी जोडलेली ही वायूवाहिनी गोव्याच्या अनेक गावांतून जाणार आहे. अशा स्थितीत या वायूवाहिन्या म्हणजे नागरिकांवरील टांगती तलवार ठरू नयेत याची पुरेशी दक्षता घेणे अपरिहार्य असेल.

0 आपली प्रतिक्रिया:


राष्ट्रपतींसमवेत गोव्यातील इतर दैनिकांच्या संपादकांसमवेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP