नमस्कार

माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...



त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...







Tuesday, April 26, 2011

जीवनशैलीच्या व्यथा

माहिती तंत्रज्ञानासारख्या उद्योगांची भारतामध्ये जसजशी भरभराट होत चालली आहे, तसतशी नव्या पिढीची जीवनशैलीही बदलत चाललेली दिसते आहे. कोवळ्या वयात भरभक्कम पगार, सोयीसवलती आणि त्याच जोडीने कामाचा प्रचंड उरक हे आपल्या अवतीभवतीचे नेहमीचे दृश्य आहे. कामाचे विशिष्ट तास हे बंधन होम ऑफिस संस्कृतीमध्ये लयाला चालले आहे. त्यामुळे अहोरात्र काम आणि त्याचा तितकाच घसघशीत मोबदला हे चित्र सुखावह जरी दिसत असले, तरी त्यातून निर्माण होणार्‍या नव्या जीवनशैलीचे फार मोठे दुष्परिणाम घडू लागले आहेत. आपल्या पगाराच्या मोठ्या आकड्यांवर समाधानी असलेल्या आणि तो आकडा अधिकाधिक कसा फुगेल याच्याच चिंतनात व्यस्त असलेल्यांना आपल्या या बदललेल्या जीवनशैलीतून कोणकोणते आजार जडू शकतात, अहोरात्र जो ताण आपण मनावर वागवतो आहोत, त्याचे कोणते दुष्परिणाम आपल्या शरीरावर हळूहळू घडू लागले आहेत, याची जाणीवही नसल्याचे दिसेल. काळाच्या गतीमानतेशी शर्यत लावलेल्या या कॉर्पोरटस्‌ना हळूहळू आपल्या कवेत घेणार्‍या जीवनशैलीशी निगडीत ह्रदयविकार, मधूमेह, मूत्रपिंड विकार, उच्च रक्तदाब, पाठदुखी, मानदुखी अशा नानाविध विकारांकडे लक्ष द्यायला फुरसत नसली, तरी हे सायलंट किलर आपल्या गात्रांना कमकुवत करीत चालले आहेत. असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री किंवा असोचॅम ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले की आजच्या कॉर्पोरेटस्‌पैकी ५२ टक्क्यांमध्ये अशा जीवनशैलीशी संबंधित विकारांची समस्या आहे. यावरून हे प्रमाण किती झपाट्याने वाढत चालले आहे आणि ऑक्टोपससारखे चहुबाजूंनी कॉर्पोरेटस्‌ना कवेत घेत चालले आहे हे लक्षात येईल. सन २०२० पर्यंत ह्रदयविकार हे भारतातील मृत्यूंचे मोठे कारण असेल असा अंदाज व्यक्त केला जातो. जगामध्ये घडणार्‍या एकूण मृत्यूंपैकी साठ टक्के मृत्यू हे असांसर्गजन्य आजारांतून होत असतात. या असांसर्गजन्य आजारांमध्ये अर्थातच जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण मोठे आहे. इन्फोसिससारखी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांवरील मानसिक ताणांची दखल घेऊन २४ तास हॉटलाईन राबवते. त्याद्वारे आपल्या किमान ३० कर्मचार्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. असे प्रयत्न अर्थातच अपवादात्मक. बाकी कॉर्पोरेट जगतामध्ये कर्मचार्‍यांच्या जीवनशैलीशी आपला काही संबंध नाही, असाच पवित्रा बहुधा दिसून येतो. देशात आधुनिकीकरणाचे वारे वाहात असल्याने आपण दिवसेंदिवस फास्ट फूड संस्कृतीकडे वळू लागलो आहोत. त्यातून वेळीअवेळी खाणे, अहोरात्र काम करणे यातून स्वतःकडे लक्ष देण्यास आजच्या युवापिढीला वेळ नाही. व्यायाम करण्यास तर सवडच नाही. अशा परिस्थितीत ही जीवनशैलीच आपल्या मुळावर येते आहे हे लक्षात घ्यावे लागेल. वैयक्तिक पातळीवर तर या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेतच, परंतु एका व्यापक स्तरावर देशापुढील या मोठ्या धोक्याचा सामना करण्याच्या दिशेने कार्यशैलीतील बदलही अपेक्षित आहेत. जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे देशाला सन २०१५ पर्यंत २३६.६ अब्ज डॉलरचा फटका बसणार आहे, असे एक सर्वेक्षण सांगते. याचाच अर्थ जीवनशैलीशी निगडित आजार ही केवळ वैयक्तिक समस्या नाही. ती एक राष्ट्रीय समस्या आहे. बहुतेक विकसनशील देशांमध्ये अशीच परिस्थिती आहे. परंतु भारतासाठी एक लाभदायक गोष्ट म्हणजे येथे या समस्येचे उत्तरही आपल्या परंपरेमध्ये आहे. योगापासून आयुर्वेदापपर्यंत आणि अध्यात्मापासून संगीतापर्यंतच्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या परंपरेतून त्याज्य गोष्टी दूर सारून आणि अमृतकण वेचून आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी त्याची सांगड घालण्याचा जर प्रयत्न झाला, तर आजच्या ताणतणावांतून, आहारविषयक समस्यांतून आपली सुटका होऊ शकते. शैक्षणिक स्तरापासून कॉर्पोरेट जगतापर्यंत त्यासाठी एक व्यापक परिवर्तन घडावे लागेल, तरच हे शक्य होऊ शकेल.

0 आपली प्रतिक्रिया:


राष्ट्रपतींसमवेत गोव्यातील इतर दैनिकांच्या संपादकांसमवेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP