कलमाडींचे दिवस फिरले होतेच. अखेर काल त्यांना अटक झाली. गेले काही महिने सुरू असलेल्या सीबीआय चौकशीअंती कलमाडींना तुरुंगाची हवा खावी लागणार हे तसे स्पष्टच होते. ज्या प्रकारे राष्ट्रकुल स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने कलमाडींनी एकसूत्री कारभार हाकला, कंत्राट बहालीत मनमानी केली, ती त्यांची कार्यपद्धतीच त्यांना भोवली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनाचा डोलारा पेलणे हे काही येरा गबाळ्याचे काम नव्हते. कलमाडींचा आजवरचा क्रीडा क्षेत्रातील अनुभव या आयोजनासाठी नक्कीच पूरक ठरला. परंतु एवढ्या मोठ्या क्रीडा सोहळ्याची सर्व सूत्रे आपल्या हाती एकवटलेली आहेत या तोर्यात बेदरकारपणे त्यांनी जे निर्णय घेतले, तेच त्यांच्या मुळावर आले आहेत. कलमाडी हा जणू भगभगता दिवा आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तो लागला, तेवढ्याच वेगाने विझला आहे. सत्तरच्या दशकामध्ये युवक कॉंग्रेसचा साधा जिल्हाध्यक्ष असलेला हा माणूस चार वर्षांतच वयाच्या ३७ व्या वर्षी राज्यसभेचा खासदार बनला तो काही स्वकर्तृत्वावर नव्हे. तरुण तुर्क संजय गांधींच्या वरदहस्ताने कलमाडींचे कल्याण झाले. त्यांचा पुढचा सारा प्रवास त्या पायावर बेतलेला आहे हे लक्षात घेतले, तर त्यांच्या पुढील पतनाची संगती लागते. एकेकाळी पुण्यामध्ये ‘पूना कॉफी हाऊस’ चालवणारा हा माणूस आज एका मोठ्या औद्योगिक साम्राज्याचा धनी आहे. राजकारणात पाय रोवतानाच त्यांनी त्याची शिडी वापरून औद्योगिक विश्वातही पाय रोवले. ७४ साली त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियमची एजन्सी पटकावली. त्यानंतर मारुती उद्योग, बजाज आणि आता महिंद्राच्या वितरणाचा व्यवसाय त्यांनी मिळवून भरभराटीला आणला. ‘साई सर्व्हिस’ ही त्यांची एजन्सी मुंबई, कोल्हापूर, कोची आणि गोव्यातील लक्षावधी ग्राहकांना सेवा पुरवते आहे. कलमाडी हे बघता बघता पुण्यातील बडे प्रस्थ झाले. पुणे फेस्टीव्हलपासून क्रीडा स्पर्धांपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये वावरताना कधी कोणाची साथ द्यायची आणि कधी कोणापासून दूर व्हायचे हे यशस्वी राजकारणाचे सूत्र त्यांनी अचूक सांभाळले. लोकसभेत पाऊल टाकण्याआधी त्यांना सातत्याने राज्यसभेची खासदारकी मिळाली ती उगीच नव्हे. एकेकाळी या महाशयांनी भारत - पाकिस्तान युद्धात भारतीय हवाई दलाचा वैमानिक या नात्याने मर्दुमकी गाजवली होती म्हणे. त्यासाठी त्यांना आठ पदकेही मिळाली होती. परंतु राजकारणाच्या राड्यात हा गृहस्थ उतरला आणि झपाट्याने शिखर गाठता गाठता आता त्यावरून धाड्दिशी खालीही फेकला गेला आहे. दिवस फिरले की घरचे वासेही फिरतात असे म्हणतात. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येताच कलमाडींच्या राजकीय प्रवासाला ज्यांनी ज्यांनी टेकू दिला, त्यांनी तो काढून स्वतः नामानिराळे झाले. त्यामुळे खापर फक्त कलमाडींवर फोडले गेले आहे. कलमाडींना झालेली अटक ही ‘टाइम कीपिंग’ उपकरणाच्या कंत्राटात वशिलेबाजी केल्याबद्दल आहे. हे कंत्राट दिले जाण्याच्या आधीच त्यांनी स्वीस ओमेगाची माणसे येथे आहेत आणि त्यांना हे कंत्राट दिले जाणार आहे असे वार्षिक सर्वसाधारण सभेत दणकून सांगितले होते. त्या कंपनीच्या प्रतिनिधींनी आयोजन समितीच्या बैठकांनाही हजेरी लावल्याचे तपासात उघड झाले आहे. कलमाडींच्या अतिउत्साही कारभाराचा कोणी पडद्यामागून गैरफायदा तर घेतलेला नाही ना, याचा खरे तर तपास व्हायला हवा. खापर कलमाडींवर फोडले गेले असले, तरी एकंदर कंत्राट व्यवहारामध्ये जी मंडळी, जे दलाल गुंतलेले होते, त्या सर्वांची सखोल चौकशी झाली, तर कदाचित काही वेगळे चित्रही समोर येऊ शकते. राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनात केवळ हा एकच व्यवहार झालेला नाही. अशी अनेक कंत्राटे नियम धुडकावून मनमानीपणे दिली गेली आहेत. ते कटकारस्थान कोणाचे होते, त्यामध्ये कोण कोण सामील होते हेही जनतेसमोर यायला हवे. कलकलमाडी हे सरकारच्या संरक्षण सल्लागार समितीचे आणि संरक्षणविषयक स्थायी समितीचेही सदस्य आहेत. तेथे तर लष्करी शस्त्रास्त्रखरेदीचा अब्जावधींचा व्यवहार चालतो. त्या व्यवहारांचीही चौकशी होणार आहे की नाही? कलमाडी हे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे छोटेसे टोक आहे. त्याखालचा हिमनग पाण्याखालीच राहून नाही चालणार.
नमस्कार
माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...
त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...
त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...


0 आपली प्रतिक्रिया:
Post a Comment