नमस्कार

माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...



त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...







Friday, April 29, 2011

नारायणास्त

‘‘माझे नाव ना. ग. आठवले आहे आणि फुत्कारणे हा माझा धर्म आहे’’ असे ठणकावून सांगणारे नारायण आठवले काल काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या अवघ्या दहा वर्षांच्या येथील कारकिर्दीत गोव्याच्या पत्रकारितेतच नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये तेजाने तळपलेला नारायण अस्ताला गेला. येथे संपादक म्हणून अनेकजण आले आणि गेले, परंतु माधव गडकरी आणि नारायण आठवले ही दोन नावे गोमंतकीय पत्रकारितेच्या नभांगणात सूर्य आणि चंद्रासारखी अढळ आणि अमर ठरली आहेत, याचे कारण त्यांचे शैलीदार लिखाण हे तर आहेच, परंतु त्याहून अधिक त्यांचा समाजसन्मुख दृष्टिकोन त्याला कारणीभूत आहे. हे दोघेही कधी काचेच्या केबिनमध्ये स्वतःला कोंडून घेऊन राहिले नाहीत. ते येथील समाजामध्ये मिसळले, लाल मातीचे रस्ते आणि पायवाटा तुडवीत येथील खेडोपाडी पोहोचले, वाचकांशी, त्यांच्या सुख - दुःखाशी एकरूप झाले. शिवाय तो काळही वेगळा होता, भारलेला होता. आठवल्यांनी कधी आपल्या तळपत्या लेखणी आणि वाणीने प्रतिपक्षाला माध्यान्हीच्या उन्हाचा चटका कसा असतो ते दाखवले, तर कधी अंधारात चाचपडलेल्यांची पुढची वाट प्रकाशकिरणांनी उजळूनही टाकली. त्यांचे एकूण जीवनच वादळी होते. संघसंस्कारांत वाढलेले आठवले गांधी हत्येनंतर सेवा दलात पोहोचले. भाववाढविरोधी सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. त्या काळात प्रधान मास्तरांच्या तुरुंगातल्या बौद्धिकांनी त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून टाकली. आयुष्य समाजासाठीही देता येते हा महामंत्र गवसलेला हा तरुण मग त्या ध्यासाने झपाटला गेला नसता तरच नवल. बंडखोरी तर रक्तातच होती. आचार्य अत्र्यांवर चप्पल उगारण्यापासून गोवा मुक्तीलढ्याच्या रणांगणात विद्यार्थी तुकडीसह उतरण्यापर्यंत वयाला साजेसे उपद्व्याप त्यांनी त्या काळात केले. ललित साहित्यात रमणारा अनिरुद्ध पुनर्वसू बघता बघता मागे पडला आणि नारायण आठवले नावाचे प्रभंजन पत्रकारितेच्या आसमंतात घोंगावत राहिले. माधव गडकर्‍यांनी या बंडखोर तरुणाला गोव्याचा मार्ग दाखवला आणि हे वादळ गोव्यात थडकले. पुढची दहा वर्षे येथे आठवल्यांची होती. त्यांची येथील संपादकीय कारकीर्द, त्यांचा लढाऊ बाणा, त्यातील बर्‍या-वाईट गोष्टी हा सारा इतिहास जनतेसमोर आहे. कोणत्याही कर्तृत्ववान व्यक्तीभोवती गोळा होतो, तसा गोतावळा त्यांच्याभोवतीही जमला. त्यातून नाना वदंताही पसरल्या, पसरवल्या गेल्या. परंतु पारदर्शकता आणि प्रांजळपणा हा आठवल्यांच्या एकंदर कर्तृत्वाचा ठळक विशेष होता. जे केले त्याची जबाबदारी घेणे त्यांनी टाळले नाही. लपवाछपवीचे ढोंगी खेळ त्यांना जमले नाहीत. तत्त्वनिष्ठेचा आव आणण्याचा दांभिकपणाही त्यांनी कधी केला नाही. त्यामुळे वाल्याचा वाल्मिकी करताना ते कचरले नाहीत आणि तुटो हे मस्तक.. म्हणता म्हणता नमते घेणेही त्यांना गैर वाटले नाही. चित्रलेखा मधून शिवसेना - भाजपावर अहोरात्र शरसंधान केल्यानंतरही जेव्हा स्वतः बाळासाहेबांनी लोकसभेची उमेदवारी देऊ केली, तेव्हा आपली तलवार म्यान करण्याचे पथ्य पाळण्यासही कुरकुर केली नाही. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्‍नावर आवाज उठवला. ताठ कणा आणि लढाऊ बाणा असलेल्या आठवल्यांची दुसरी बाजूही फार मनोज्ञ होती, ते होते त्यांचे माणूसपण. तोंडी शिव्या असल्या, तरी त्यामागचे प्रेम लपत नसे. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आणि त्यांनी लोकांवर. त्यांचा वसा इतरांना पुढे पेलला नाही. गोव्यातील आपल्या कारकिर्दीचा अभिमान त्यांना होता. गोव्याने आपल्याला नवे आयुष्य दिले, असे ते म्हणत असत. त्यांनी येथे उभे केलेले सामाजिक कार्य तर केवळ अजोड आहे. मंगेश पाडगावकरांनी उल्लेखिलेला दैनिकाच्या दोन कॉलमांपलीकडे ज्याची धाव नाही असा संपादक मनात आणले तर काय करू शकतो, त्याचा प्रत्यय आठवल्यांनी दहा वर्षांच्या गोव्यातील आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वांना आणून दिला. लोकविश्वास प्रतिष्ठानापासून गोमंतक मराठी अकादमीपर्यंत आठवल्यांच्या कर्तृत्वाच्या ध्वजा आज आसमंतात फडकत आहेत. एका झुंजार संपादकाची ती खरी आठवण आहे.

0 आपली प्रतिक्रिया:


राष्ट्रपतींसमवेत गोव्यातील इतर दैनिकांच्या संपादकांसमवेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP