दाबोळी विमानतळावरील सुरक्षा उपकरणे बंद असताना येथे विमाने उतरवण्यास ‘इंडियन कमर्शियल पायलटस् असोसिएशन’ किंवा ‘आयसीपीए’ या एअर इंडियाच्या वैमानिकांच्या एका संघटनेने काल नकार दिला. एकामागोमाग एक उघडकीस आलेल्या बनावट वैमानिक प्रकरणांनी आधीच विमान प्रवासी हादरलेले असताना दाबोळी विमानतळावर गेले काही दिवस विमाने उतरवण्यासाठी अत्यावश्यक असलेली साधने बंद असतानाच विमाने उतरवली जात होती हा प्रवाशांसाठी दुसरा धक्का आहे. दाबोळी विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीकामासाठी तेथील ‘पॅपी’ व ‘जीपी’ ही साधने गेल्या ४ एप्रिलपासून सकाळी नऊ ते एक व संध्याकाळी तीन ते सात या वेळेत बंद ठेवण्यात येत आहेत. येत्या ३० एप्रिलपर्यंत ती अशा प्रकारे बंद ठेवली जातील. ही दोन्ही साधने विमाने विमानतळावर उतरवताना महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ‘पॅपी’ किंवा ‘प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ म्हणजे धावपट्टीवर उघडमीट करणारे मार्गदर्शक दिवे. कोणत्याही विमानतळावरील विमानांना हे दिवे उड्डाणासाठी व उतरताना मार्गदर्शक ठरत असतात. एअर ट्रॅफिक कंट्रोलद्वारे ही यंत्रणा संचालित केली जाते व विमानतळावर अशा प्रकारची यंत्रणा धावपट्टीवर असणे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अत्यावश्यक मानले गेले आहे. ही यंत्रणा नसताना प्रवासी विमाने उतरवण्यास डीजीसीएची मनाई आहे. ‘जीपी’ किंवा ‘ग्लाईड पाथ’ ही दुसरी यंत्रणाही विमान धावपट्टीवर उतरत असताना ते किती अंशांत उतरते आहे, त्याची माहिती वैमानिकाला पुरवीत असते. दाबोळी विमानतळावर सध्या या दोन्ही यंत्रणा बंद असताना तेथे विमाने उतरवणे ही बाब येथे उतरणार्या वेगवान जेट विमानांच्या प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते. या दोन्ही यंत्रणा बंद असताना विमाने उतरवताना वैमानिकाला केवळ स्वतःच्या अंदाजावर अवलंबून राहावे लागते. जेट विमानाचा वेग लक्षात घेतला, तर केवळ वैमानिकाच्या व सह वैमानिकाच्या अंदाजाच्या भरवशावर विमाने उतरवणे किती घातक ठरू शकते हे मंगळूरमध्ये गतवर्षी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेने दाखवून दिलेच आहे. त्यामुळे वैमानिक संघटनेने घेतलेली कडक भूमिका केवळ अडवणुकीची आहे असे म्हणता येणार नाही आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा त्यांचा मुद्दाही दुर्लक्षिता येणार नाही. नौदलाच्या विमानांना वा टर्बो विमानांचे या यंत्रणा बंद असल्या तरी विशेष बिघडत नसले, तरी शेकडो प्रवाशांना घेऊन जाणार्या जेट विमानांच्या बाबतीत एवढा मोठा धोका पत्करणे योग्य म्हणता येत नाही. आधीच आपण प्रवास करीत असलेल्या विमानातील वैमानिक हा खरोखर अनुभवी व आवश्यक पात्रता धारण करणारा वैमानिक आहे की गैरमार्गाने प्रमाणपत्रे मिळवून तो भरती झाला आहे, याचाही भरवसा गेल्या काही दिवसांत उघडकीस आलेल्या प्रकरणांमुळे राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांत तेरा बनावट वैमानिकांचा पर्दाफाश झाला. त्यापैकी सहा कमांडर आणि सात सहवैमानिक होते. विशेष म्हणजे बोगस वैमानिकांचे हे एवढे गंभीर प्रकरण कॅप्टन परमिंदर कौर गुलाटी या महिला वैमानिकाने दाबोळी विमानतळावर चुकीच्या पद्धतीने पुढील चाकावर प्रवासी विमान उतरवल्यामुळेच उघडकीस आले हे उल्लेखनीय आहे. देशात खासगी विमान कंपन्यांचा सुळसुळाट झाल्यापासून वैमानिकांची चणचण भासू लागली. त्याचीच परिणती म्हणून वैमानिक प्रशिक्षण देणार्या खर्या - खोट्या संस्थांचे पेव फुटले. त्या अहमहमिकेतून बोगस वैमानिकांची भरती करून लाखो विमान प्रवाशांच्या जिवाशी खेळ मांडला गेला. आता दाबोळी विमानतळावर असुरक्षित परिस्थितीत विमाने उतरवून पुन्हा एकदा असाच जिवाशी खेळ मांडला जात आहे. त्याचे गांभीर्य नागरी विमानवाहतूक मंत्रालयाने जाणणे जरुरी आहे. विमान प्रवाशांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेऊन त्यांच्या जिवाशी अशा प्रकारे खेळ मांडणे योग्य नव्हे. त्यामुळे वैमानिकांच्या संघटनांनी घेतलेला पवित्रा खरे तर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने घ्यायला हवा. त्यांनी विशिष्ट काळात दाबोळीत विमाने उतरवण्यास मनाई आदेश जारी केला आहे, परंतु त्या आदेशाचे खासगी विमान कंपन्यांकडून पालन होते की नाही हे एखादी दुर्घटना घडण्याआधी पाहणे आवश्यक आहे.
नमस्कार
माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...
त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...
त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...



0 आपली प्रतिक्रिया:
Post a Comment