नमस्कार

माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...



त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...







Wednesday, April 27, 2011

कनिमोझीवरची कारवाई

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ए. राजा यांची दीर्घकाळ पाठराखण द्रमुकने का केली, हे करुणानिधींची कन्या कनिमोझी हिच्या अटकेमुळे पुरेपूर स्पष्ट झाले आहे. ज्या स्वान टेलिकॉमला राजा यांनी टूजी स्पेक्ट्रम स्वस्तात मिळवून दिले, तिचा प्रणेता शाहीद बालवाने या उपकारांची परतफेड म्हणून डायनामिक्स रिअल्टी या स्वतःच्याच कंपनीकडून कुसेगाव फ्रूट अँड व्हेजिटेबल्स लिमिटेड आणि सिनेयुग फिल्म्स या दोन कंपन्यांच्या मार्फत करुणानिधींची कन्या कनिमोझीच्या कलैगनार टीव्हीला दोनशे कोटींची लाच हस्तांतरित केली. दोनशे कोटींची ही रक्कम कर्जाऊ घेतली गेली होती व तिची परतफेड केली गेली आहे वगैरे कांगावा आता द्रमुक करीत असला, तरी सुज्ञांस सांगणे न लगे. सीबीआयने ए. राजावर जे आरोप ठेवले होते, तेच कनिमोझीवर ठेवले गेले आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. या परिस्थितीत द्रमुक आणि कॉंग्रेस यांच्या संबंधांना धक्का लागेल का आणि लागला तर त्याचे केंद्र सरकारच्या स्थैर्यावर काय परिणाम संभवतात हा आजच्या घडीस लाखमोलाचा प्रश्‍न आहे. द्रमुकने आज बुधवारी सकाळी या संदर्भात निर्णयासाठी बैठक बोलावली आहे. द्रमुक आणि कॉंग्रेस यांचे संबंध ए. राजा प्रकरणात ताणले गेले तेव्हा द्रमुकने राजा यांचा बळी देऊन नमते घेतले कारण तामिळनाडूची विधानसभा निवडणूक तोंडावर होती. गेल्या महिन्यात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून पुन्हा तणातणी झाली, तेव्हा कॉंग्रेसने ठाम पवित्रा घेतल्याने अडचणीत आलेल्या द्रमुकने पुन्हा माघार घेत तडजोड केली. आता कनिमोझी प्रकरणात तिसर्‍यांदा दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना द्रमुक कोणती भूमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. सीबीआयने कनिमोझीवर कारवाई करण्यात दिरंगाई केली असे दिसते. तामिळनाडूतील विधानसभा निवडणूक आटोपेपर्यंत कनिमोझीविरुद्धची कारवाई लांबवली गेली हे वेगळे सांगायला नको. कनिमोझीला दोषी धरताना करुणानिधींची पत्नी दयालु अम्मल हिला या प्रकरणातून सीबीआयने अलगद बाजूला काढले त्यामागचा हेतूही स्पष्ट  आहे. वास्तविक दयालू अम्मल ही कलैगनार टीव्हीची एक संचालक आहे आणि जवळजवळ साठ टक्के शेअर तिच्या नावे आहेत. तरीही तिला बाजूला काढण्याची सीबीआयची कृती आश्‍चर्यजनक आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावरून सीबीआयची खरडपट्टी काढली जाऊ शकते. तूर्त दयालू अम्मल हिला या प्रकरणातून अभय दिले गेल्याने करुणानिधींचे पुत्र स्टालीन आणि अझागिरी यांनाही या संघर्षाबाहेर ठेवले गेले आहे. कॉंग्रेस - द्रमुक संबंध तुटू न देण्यासाठी असे अनेक कच्चे धागे सीबीआयकडून हेतुतः ठेवले गेले आहेत असे वाटते. त्यामुळे सापही मरावा आणि काठीही तुटू नये अशा या खेळीची परिणती काय होईल, द्रमुक केंद्र सरकारमधून अंग काढून घेण्याइतपत आत्मघाती पाऊल उचलील का या प्रश्‍नाचे उत्तर बर्‍याच अंशी नकारार्थीच मिळते. तामिळनाडू विधानसभा निकाल तोंडावर आहेत. कॉंग्रेसच्या साथीने तेथे निवडणूक लढवलेली असल्याने जयललितांच्या हाती सत्तेचा घास देण्याची द्रमुकची तयारी नसेल. त्यामुळे सद्यपरिस्थितीत थोडे नमते घेणे हेच द्रमुकच्या हिताचे ठरते. पण शेवटी मामला कौटुंबिक आहे. राजा यांना तुरुंगाची हवा खायला पाठवले तसे कनिमोझीला पाठवण्याची करुणानिधींची निश्‍चितच तयारी नसेल. कॉंग्रेससाठीही द्रमुकशी संबंध पूर्णपणे तोडणे हिताचे नाही. केंद्रातील अठरा खासदारांच्या समर्थनाचा तर प्रश्‍न आहेच, परंतु त्याहून अधिक तामिळनाडू विधानसभा निकालानंतरच्या घडामोडींकडे त्या पक्षाचे लक्ष आहे. एकीकडे दोषी व्यक्तींवर कारवाई करीत असल्याचे दाखवून स्वतःची खालावलेली प्रतिमा सावरायची आणि दुसरीकडे त्या कारवाईतून हितसंबंध दुखावले जाणार नाहीत हेही पाहायचे अशी कसरत कॉंग्रेस नेतृत्वाकडून बराच काळ चालली आहे. ए. राजा यांना एकटे पाडले गेले आणि मग त्यांच्यावर कारवाई झाली. कलमाडींना एकटे पाडले गेले आणि कारवाई झाली. कनिमोझी हिच्याबाबतीतही तसाच प्रयत्न केला गेला आहे. स्टालिन आणि अझागिरी यांना या संघर्षात न ओढता, दयालू अम्मलला प्रकरणात न गोवता कनिमोझीपुरता हा विषय सीमित ठेवण्याचे कारण तेच तर आहे. द्रमुक या चुचकारण्याला बधेल की नाही हे आज स्पष्ट होईल.

0 आपली प्रतिक्रिया:


राष्ट्रपतींसमवेत गोव्यातील इतर दैनिकांच्या संपादकांसमवेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP