Wednesday, February 24, 2016

खायचे दात

भारताच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेने पाकिस्तानला आठ एफ - १६ लढाऊ विमाने देण्याचा आपला निर्णय पुढे रेटला आहे. ही विमाने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेसाठी देण्यात येत असल्याचा आव जरी अमेरिकेने आणला असला, तरी प्रत्यक्षात पाककडून त्याचा वापर भारताला बेटकुळ्या दाखवण्यासाठी केला जाण्याचीच अधिक शक्यता आहे. हे अमेरिकेला ज्ञात नाही असे नव्हे, परंतु भारत आणि पाकिस्तानला आपसांत झुंजवत ठेवण्याने भारतासारख्या उभरत्या महासत्तेवर अंकुश राहील हे पुरेपूर ठाऊक असल्यानेच पाकिस्तानला चुचकारण्याची नीती अव्याहतपणे सुरू आहे. खरे तर भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले, तेव्हा भारताचा कल रशियाच्या बाजूने होता. अमेरिका सुरवातीपासूनच पाकिस्तानच्या बाजूने राहिली. पाकिस्तानमध्ये लोकशाही कधीच नीट रुजू शकली नाही हे दिसत असूनही अमेरिका आपली नीती बदलायला तयार नाही. पाकिस्तान हे जिहादी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे याचे बळकट पुरावे वेळोवेळी मिळूनही त्याकडे कानाडोळा करीत आपली लष्करी व आर्थिक मदत अमेरिकेने सुरूच ठेवली आहे. दक्षिण आशियामध्ये स्वतःचा प्रभाव कायम राखण्याची ही खेळी आहे. पाकिस्तान आणि चीन दरम्यान पन्नास अब्ज डॉलरचा आर्थिक कॉरिडॉर प्रकल्प उभारला जात आहे. चीनचे प्राबल्य वाढताना दिसत असल्याने पाकिस्तान आणि चीन अधिक निकट येऊ नयेत यासाठी मारलेली ही पाचर आहे. शिवाय पाकिस्तानमध्ये अमेरिकी व्यापारी संस्कृतीचा शिरकाव करण्याची संधीही या निमित्ताने त्यांना मिळते आहे. आज पाकिस्तानमध्ये मॅकडोनाल्डस्, डॉमिनोज्, पिझ्झा हट सारख्या अमेरिकी आस्थापनांच्या साखळ्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अनेक अमेरिकी कंपन्या तेथे गुंतवणूक करू लागल्या आहेत. त्यामुळे या आर्थिक लाभांवरही अमेरिकेची नजर आहेच. अमेरिकेच्या दुष्ट मनसुब्यांचा पर्दाफाश ङ्गविकीलिक्सफने काही काळापूर्वी केला होता. त्यांनी इस्लामाबादेतील दूतावासाने पाठवलेले गोपनीय संदेशच उघड केले होते. अमेरिकेची व्यापक धोरणात्मक व्यूहरचना त्यातून स्पष्ट झाली होती. अमेरिकेचा या शतकातला सर्वांत मोठा शत्रू ओसामा बिन लादेन पाकिस्तानातील अबोटाबादेत आश्रयाला होता हे उघड झाल्यानंतर तरी अमेरिकेचा पाकिस्तानविषयीचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली. पाक - अफगाण सीमेवरील दहशतवाद्यांविरुद्ध मोहिमेला बळकटी आणण्यासाठी ही लढाऊ विमाने दिली जात आहेत असे अमेरिका भासवते आहे. भारताने या व्यवहाराला विरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अमेरिकेतील भारतवादी नेत्यांनी या खरेदी व्यवहाराविरुद्ध भूमिका उघडपणे घेतली. एरव्ही पाकिस्तानच्या बाजू राहणार्‍या रिपब्लिकन पक्षाचे नेते टेड पो आदींनी आपला हा विरोध प्रखरपणे मुखर केला. पाकिस्तानला मानवतावादी मदतकार्यासाठी विमाने हवीच असतील, तर अमेरिकेने त्यांना सी - १३० सारखी मालवाहक विमाने पुरवावीत; एफ - १६ पुरवण्याचे कारणच काय असा त्यांचा रास्त सवाल होता. परंतु अमेरिका वेळोवेळी पाकिस्तानला भारताच्या तुल्यबळ बनवण्यात रस घेत आली आहे. ऐंशीच्या दशकात एफ - १६ विमानांचा पहिला ताफा अमेरिकेने पाकिस्तानला पुरविला होता. ९० च्या दशकात आणखी २८ विमाने दिली जाणार होती, परंतु भारत - पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या अण्वस्त्रस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रेस्लर सुधारणांमुळे तो व्यवहार रद्द करण्यात आला. परंतु २००६ साली पुन्हा अठरा एफ - १६ विमाने पुरवण्याच्या कंत्राटावर उभयपक्षी सह्या झाल्या. पाकिस्तानला आपली हवाई ताकद वाढवायची आहे. जुनाट झालेली मिराज - ३ विमाने सन २०२० पर्यंत निकाली काढून अद्ययावत विमानांनी आपले हवाई दल सज्ज बनवायचे आहे. अमेरिका केवळ विमानेच पुरवते आहे असे नव्हे, तर पाकिस्तानी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यापासून उपकरणसामुग्री पुरवण्यापर्यंत सर्व कैवार त्यांनी घेतला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विविध देशांमध्ये त्यांनी जी भटकंती केली, त्यातून एकेका देशाशी निकट संबंध प्रस्थापित झाल्याचा आभास जरी उत्पन्न केला गेला, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी दिसत नाही. ज्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन वेळा भारतात येऊन गेले, मोदींनी ‘बराक, बराक’ करीत त्यांच्याशी सलगी दाखवली, तीच अमेरिका भारताविरुद्ध पाकिस्तानचे हात बळकट करीत आहे हे पाठीत सुरा खुपसण्यासारखेच नाही काय? अमेरिकेचे खायचे दात या व्यवहारातून दिसले आहेत!

No comments:

Post a Comment