Wednesday, February 24, 2016
खायचे दात
भारताच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेने पाकिस्तानला आठ एफ - १६ लढाऊ विमाने देण्याचा आपला निर्णय पुढे रेटला आहे. ही विमाने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेसाठी देण्यात येत असल्याचा आव जरी अमेरिकेने आणला असला, तरी प्रत्यक्षात पाककडून त्याचा वापर भारताला बेटकुळ्या दाखवण्यासाठी केला जाण्याचीच अधिक शक्यता आहे. हे अमेरिकेला ज्ञात नाही असे नव्हे, परंतु भारत आणि पाकिस्तानला आपसांत झुंजवत ठेवण्याने भारतासारख्या उभरत्या महासत्तेवर अंकुश राहील हे पुरेपूर ठाऊक असल्यानेच पाकिस्तानला चुचकारण्याची नीती अव्याहतपणे सुरू आहे. खरे तर भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले, तेव्हा भारताचा कल रशियाच्या बाजूने होता. अमेरिका सुरवातीपासूनच पाकिस्तानच्या बाजूने राहिली. पाकिस्तानमध्ये लोकशाही कधीच नीट रुजू शकली नाही हे दिसत असूनही अमेरिका आपली नीती बदलायला तयार नाही. पाकिस्तान हे जिहादी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे याचे बळकट पुरावे वेळोवेळी मिळूनही त्याकडे कानाडोळा करीत आपली लष्करी व आर्थिक मदत अमेरिकेने सुरूच ठेवली आहे. दक्षिण आशियामध्ये स्वतःचा प्रभाव कायम राखण्याची ही खेळी आहे. पाकिस्तान आणि चीन दरम्यान पन्नास अब्ज डॉलरचा आर्थिक कॉरिडॉर प्रकल्प उभारला जात आहे. चीनचे प्राबल्य वाढताना दिसत असल्याने पाकिस्तान आणि चीन अधिक निकट येऊ नयेत यासाठी मारलेली ही पाचर आहे. शिवाय पाकिस्तानमध्ये अमेरिकी व्यापारी संस्कृतीचा शिरकाव करण्याची संधीही या निमित्ताने त्यांना मिळते आहे. आज पाकिस्तानमध्ये मॅकडोनाल्डस्, डॉमिनोज्, पिझ्झा हट सारख्या अमेरिकी आस्थापनांच्या साखळ्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अनेक अमेरिकी कंपन्या तेथे गुंतवणूक करू लागल्या आहेत. त्यामुळे या आर्थिक लाभांवरही अमेरिकेची नजर आहेच. अमेरिकेच्या दुष्ट मनसुब्यांचा पर्दाफाश ङ्गविकीलिक्सफने काही काळापूर्वी केला होता. त्यांनी इस्लामाबादेतील दूतावासाने पाठवलेले गोपनीय संदेशच उघड केले होते. अमेरिकेची व्यापक धोरणात्मक व्यूहरचना त्यातून स्पष्ट झाली होती. अमेरिकेचा या शतकातला सर्वांत मोठा शत्रू ओसामा बिन लादेन पाकिस्तानातील अबोटाबादेत आश्रयाला होता हे उघड झाल्यानंतर तरी अमेरिकेचा पाकिस्तानविषयीचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली. पाक - अफगाण सीमेवरील दहशतवाद्यांविरुद्ध मोहिमेला बळकटी आणण्यासाठी ही लढाऊ विमाने दिली जात आहेत असे अमेरिका भासवते आहे. भारताने या व्यवहाराला विरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अमेरिकेतील भारतवादी नेत्यांनी या खरेदी व्यवहाराविरुद्ध भूमिका उघडपणे घेतली. एरव्ही पाकिस्तानच्या बाजू राहणार्या रिपब्लिकन पक्षाचे नेते टेड पो आदींनी आपला हा विरोध प्रखरपणे मुखर केला. पाकिस्तानला मानवतावादी मदतकार्यासाठी विमाने हवीच असतील, तर अमेरिकेने त्यांना सी - १३० सारखी मालवाहक विमाने पुरवावीत; एफ - १६ पुरवण्याचे कारणच काय असा त्यांचा रास्त सवाल होता. परंतु अमेरिका वेळोवेळी पाकिस्तानला भारताच्या तुल्यबळ बनवण्यात रस घेत आली आहे. ऐंशीच्या दशकात एफ - १६ विमानांचा पहिला ताफा अमेरिकेने पाकिस्तानला पुरविला होता. ९० च्या दशकात आणखी २८ विमाने दिली जाणार होती, परंतु भारत - पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या अण्वस्त्रस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रेस्लर सुधारणांमुळे तो व्यवहार रद्द करण्यात आला. परंतु २००६ साली पुन्हा अठरा एफ - १६ विमाने पुरवण्याच्या कंत्राटावर उभयपक्षी सह्या झाल्या. पाकिस्तानला आपली हवाई ताकद वाढवायची आहे. जुनाट झालेली मिराज - ३ विमाने सन २०२० पर्यंत निकाली काढून अद्ययावत विमानांनी आपले हवाई दल सज्ज बनवायचे आहे. अमेरिका केवळ विमानेच पुरवते आहे असे नव्हे, तर पाकिस्तानी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यापासून उपकरणसामुग्री पुरवण्यापर्यंत सर्व कैवार त्यांनी घेतला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विविध देशांमध्ये त्यांनी जी भटकंती केली, त्यातून एकेका देशाशी निकट संबंध प्रस्थापित झाल्याचा आभास जरी उत्पन्न केला गेला, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी दिसत नाही. ज्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन वेळा भारतात येऊन गेले, मोदींनी ‘बराक, बराक’ करीत त्यांच्याशी सलगी दाखवली, तीच अमेरिका भारताविरुद्ध पाकिस्तानचे हात बळकट करीत आहे हे पाठीत सुरा खुपसण्यासारखेच नाही काय? अमेरिकेचे खायचे दात या व्यवहारातून दिसले आहेत!
फितूर
सियाचीनमध्ये पंचवीस फूट बर्फाखालून वर काढण्यात आलेल्या हनुमंतप्पा कोप्पडचे प्राण वाचावेत यासाठी अवघा देश प्रार्थना करीत असताना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये संसद हल्ल्याप्रकरणी फाशी गेलेल्या अफझल गुरूच्या ‘हौतात्म्या’ चे स्मरण चालले होते. दिल्लीच्या प्रेस क्लबमध्येही काश्मीरच्या ‘आझादी’ चे नारे लावले गेले. आपल्या देशाच्या लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा सरेआम गैरवापर तर आहेच, परंतु सियाचीनमध्ये आपले सैनिक शहीद झाल्याने हळहळणार्या देशाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. परंतु एवढे सरळसरळ देशद्रोही कृत्य होऊनही स्वतःला राष्ट्रनिष्ठ म्हणवणार्या केंद्रातील भाजप सरकारची भूमिका मात्र फारच मवाळ आणि बोटचेपेपणाची दिसली. महेश गिरी या खासदाराने तक्रार नोंदवल्यावर आता कुठे देशद्रोहाचा गुन्हा तोही ‘अज्ञात’ विद्याथ्यार्र्ंविरूद्ध नोंदवला गेला आहे. ज्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अफझल गुरूचा उदोउदो केला गेला, त्याला दंडवत घातले गेले, त्याच्या कुलगुरूंनीही आयोजकांविरुद्ध केवळ ‘शिस्तभंगा’संदर्भात चौकशी लावली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यासंदर्भात आवाज उठवला त्यालाच विरोध दर्शवीत हा विरोध म्हणजे जेएनयूच्या ‘लोकशाही परंपरे’वरील हल्ला असल्याची अजब भूमिका घेतली आहे. मुळात जेएनयूला नाव जवाहरलाल नेहरूंचे असले तरी गेली अनेक वर्षे तो नक्षलवाद्यांच्या आणि काश्मिरी फुटिरांच्या पांढरपेशा समर्थकांचा अड्डा बनलेला आहे. तेथील विद्यार्थी संघटनेवरही डाव्या विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व आहे. विद्यापीठामध्ये सरळसरळ देशद्रोही कृत्ये होत असताना त्याला विरोध करण्याऐवजी त्यांनी त्याचे अप्रत्यक्ष समर्थनच चालवले. वास्तविक, या प्रकरणामध्ये विद्यापीठ प्रशासनाची बेफिकिरी अधिक दिसते. ‘सांस्कृतिक कार्यक्रमा’ च्या नावाखाली विद्यापीठ संकुलामध्ये कोण काय आयोजित करते आहे याचा थांगपत्ताही प्रशासनाला अभाविपने विरोध दर्शवीपर्यंत नव्हता. अभाविपने विरोध करण्याआधी खरे तर विद्यापीठाने स्वतःहून सदर कार्यक्रमाला प्रतिबंध करायला हवा होता. परंतु केवळ परवानगी नाकारण्याचा सोपस्कार करून विद्यापीठ प्रशासन मोकळे राहिले. त्यामुळे अफझल गुरूचा उदो उदो तर झालाच, शिवाय ‘कश्मीर की आझादी तक, जंग रहेगी, जंग रहेगी’ चे नारेही दिले गेले. हैदराबादच्या विद्यापीठामध्ये रोहित वेमुलाचा दुर्दैवी बळी गेला, परंतु त्याच्यावर कारवाई झाली होती ती याकूब मेमनला फाशी देण्याविरुद्ध केलेल्या निदर्शनांमुळे. देशातील विद्यापीठांमधून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर देशद्रोही कृत्यांना थारा मिळणार असेल, तर या देशाचे पुढे काय होईल याची कल्पनाही करवत नाही. दहशतवाद्यांना उच्चशिक्षित तरुण जाऊन मिळण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याला काही विद्यापीठांमधील चिथावणीखोर वातावरणाची पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. अफझल गुरूचे गोडवे गाण्याचे कारणच काय? प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर तो फासावर गेला. पण त्याच्यावर अरुंधती रॉयबाईंनी पुस्तक लिहिले. उद्या कदाचित अजमल कसाबलाही त्या ‘शहीद’ ठरवतील! या देशाला दहशतवादाच्या ज्वालामुखीवर आणून ठेवण्यास कोण कोण कारणीभूत आहे, याचा हिशेब कधी तरी करावा लागणार आहे. या देशात प्रत्येक विचारधारेला मुक्त वाव आहे. पण याचा अर्थ कोणी देशद्रोह्यांचे अवास्तव समर्थन करावे असा नाही. परंतु आपल्याकडे हे होते आणि चालवूनही घेतले जाते. असे लोक येथे ‘विचारवंत’ ठरतात! काश्मिरी तरुणांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पुण्याची ‘सरहद’ सारखी संघटना गेली अनेक वर्षे काम करते आहे. याउलट दुसरीकडे देशातील तरुणांमध्ये अराष्ट्रीय वृत्तीचे बीजारोपण करण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटना वावरताना दिसत आहेत. दिल्ली प्रेस क्लबमध्ये जिथे आझादीचे नारे घुमले त्या कार्यक्रमाचे आयोजन दिल्ली विद्यापीठाच्या अली जफर या प्राध्यापकाने केले होते आणि तेथे एसएआर गिलानी या दुसर्या प्राध्यापकाने प्रक्षोभक भाषण केले. हे असले प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देत असतील? सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘फितूर’ नावाचा एक चित्रपट सुरू आहे. देशात राहून देशाचे अन्न खाऊन देशाशी गद्दारी करणारे फितूर हे आज या देशापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशद्रोह यातील सीमारेषा ठळकपणे दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे. सरकारला खरोखर राष्ट्रहित सर्वोच्च असेल तर जेथे जेथे देशाशी गद्दारी केली जाते, तेथे खंबीरपणे कारवाई व्हावी लागेल. देशद्रोहाला क्षमा नाही!
वाचा बसली?
गुजरातमध्ये १५ जून २००४ रोजी तिघा दहशतवाद्यांसमवेत चकमकीत मारली गेलेली इशरतजहॉं ही देखील दहशतवादीच होती आणि लष्कर ए तोयबाची ती फिदायीन म्हणजे आत्मघाती साथीदार होती, याचा पुनरूच्चार डेव्हीड कोलमन हेडलीने काल आपल्या जबानीत केला. ‘पुनरूच्चार’ म्हणण्याचे कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी हेडली शिकागोत पकडला गेल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक अमेरिकेत मुंबई हल्ल्यासंदर्भात त्याच्या चौकशीसाठी गेले होते, तेव्हाही हेडलीने इशरतजहॉं ही ‘लष्कर’ ची दहशतवादी असल्याचे सांगितले होते, पण तेव्हा भारतात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते आणि गुजरात दंगलीनंतर तापलेल्या तव्यावर इशरतजहॉं प्रकरण हे गुजरातमधील तत्कालीन मोदी सरकारविरुद्धचे एक ब्रह्मास्त्र म्हणून वापरता येत असल्याने सीबीआयने हेडलीच्या त्या गौप्यस्फोटाला ‘ऐकीव माहिती’ म्हणून निकाली काढले होते. आजवर इशरतजहॉंचे गुणगान करीत आलेल्या आणि ‘मानवतावादा’चा बुरखा घेतलेल्या देशद्रोह्यांचे डेव्हीडच्या ताज्या जबानीवर काय म्हणणे आहे? गेली अकरा वर्षे इशरतजहॉं चकमक प्रकरणाचे जे पराकोटीचे राजकारण झाले, गुजरातच्या पोलिसांचे, गुप्तचर यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रयत्न झाले, त्याची जबाबदारी आता कोण घेणार आहे? इशरतजहॉंसोबत मारले गेलेले तिघे तरूण हे दहशतवादी होते हे तर यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. ती ज्याची सहायक म्हणून काम करायची, तो जावेद गुलाम शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई हा लष्कर ए तोयबासाठी काम करायचा याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत. लष्कर ए तोयबाच्या म्होरक्याशी त्याच्या झालेल्या संभाषणाची ध्वनीफीत काही वर्षांपूर्वी ‘हेडलाइन्स टुडे’ ने जारी केली होती. प्रणेश हा मूळचा केरळी हिंदू. साजिदा या मुलीशी त्याने लग्न केले तेव्हा त्याचे धर्मांतर केले गेले. त्याला ‘लष्कर’ च्या जाळ्यात अडकवले गेले. आपण जावेदला जिहादी प्रशिक्षणासाठी पाठवल्याची कबुली दिल्ली पोलिसांनी २००५ साली पकडलेल्या महंमद रझाक या दहशतवाद्याने दिली होती. चकमकीत मारला गेलेला अमजद अली राणा हा तर पाकिस्तानी दहशतवादी होता. त्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करण्यात काही काश्मिरींनी मदत केल्याचे सिद्ध झाले होते. फैजाबादच्या महंमद वासी याने या टोळक्याला पिस्तुल स्टेनगन पुरवल्याची कबुली दिली होती. वास्तविक इशरतजहॉं ही देखील ‘लष्कर’ शी संबंधित असल्याची कबुली २००४ साली त्या दहशतवादी संघटनेच्याच ‘गझवा टाइम्स’ या लाहोरच्या नियतकालिकाने दिली होती. पण भारतात तिच्या हत्येचे राजकारण रंगताच जमात उद दावाने हात झटकले. पण इशरतजहॉं ही दहशतवादी असल्याचे ‘लष्कर’ पासून हेडलीपर्यंत सर्व संबंधित सांगत असूनही सीबीआयने तेव्हा जाणूनबुजून त्या आघाड्यांवर तपास करणे टाळले. त्यामागे अर्थातच सीबीआयची सूत्रे हलवणारे केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असावे. जावेद, अहमद, झीशान जौहर आणि इशरत ही चौघेही गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या मोहिमेवर निघाल्याची खबर गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती आणि त्या आधारेच गुजरात पोलिसांनी कारवाई केली होती. कोटरपूर - अहमदाबादेत झालेली ती चकमक खरी की त्यांना टोलबूथवरून आधल्या दिवशीच ताब्यात घेतले होते हा सीबीआयचा दावा खरा हा वेगळा विषय; परंतु इशरतजहॉंच्या ‘लष्कर’ शी असलेल्या संबंधांच्या खोलात शिरायचे मात्र सीबीआयने संयुक्त पुरोगामी आघाडीच्या ‘राजकीय’ सोयीसाठी चतुराईने टाळले होते हे वास्तव पुन्हा एकवार ढळढळीतपणे समोर आले आहे. इशरतजहॉंच्या निरपराधित्वाचे दाखले देत आलेल्या आणि तिला ‘हुतात्मा’ संबोधणार्या तमाम मंडळींचे भांडे हेडलीच्या या पुनरूच्चाराने फुटले आहे. आधी तिघा ‘निरपराध’ तरूणांना चकमकीत मारल्याची आवई त्यांनी उठवली. नंतर इशरतबरोबरचे तिघे दहशतवादी असल्याचे सिद्ध होताच इशरतच्या निरपराधित्वाची ओरड झाली. आता इशरत हीही दहशतवादी असल्याचा पुनरूच्चार हेडलीने केल्याने या मंडळींची आता वाचाच बसली असेल. इशरतजहॉं प्रकरणाचे भांडवल करून ज्यांनी एवढी वर्षे आरडाओरडा केला, गुजरात पोलिसांचे मनोधैर्य खच्ची केले, चकमकीशी संबंधित पोलीस अधिकार्यांना गजांआड व्हायला लावले, गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांविरुद्ध आरोप केले, त्यांनी आणि त्यांच्या राजकीय पाठिराख्यांनी आता देशाची जाहीर माफी मागायला हवी. राष्ट्रहित म्हणून काही चीज असते आणि ती सर्वोच्च असते याची जाणीव निदान एवढ्या बुरखेफाडीनंतर त्यांना होईल अशी आशा आहे.
मृत्युंजय
कधी कधी अशी एखादी बातमी कानी येते की नियती, दैव या गोष्टींवर विश्वास ठेवणे भाग पडते. बुद्धिप्रामाण्यवाद्यांचीही मती गुंग करणार्या अशा या घटना असतात. एखाद्या विद्ध्वंसक भूकंपात प्रचंड ढिगार्यांखालून एखादे अजाण बाळ अंगावर ओरखडाही नसलेल्या स्थितीत सापडते, एखाद्या भीषण अपघातातून कोणी खरचटल्याविना आश्चर्यकारकरीत्या बचावते, कोळशाच्या खाणीत गाडल्या गेलेल्या कामगारांपैकी एखादा सुदैवी अनेक दिवसांनंतरही जिवंत आढळतो, बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेला मुलगा जिवंत बाहेर काढला जातो... आपली मती गुंग करणार्या अशा घटनांना केवळ चमत्कार म्हणणे मग भाग पडते. सियाचीन हिमस्खलन दुर्घटनेत पंचवीस फूट खोल बर्फात, उणे पन्नास अंश तापमानात गाडला गेलेला लान्स नायक हनुमंतप्पा कोप्पड तब्बल सहा दिवसांनी बेशुद्धावस्थेत, परंतु जिवंत स्थितीत सापडणे हा देखील केवळ चमत्कारच म्हणावा लागेल. अशा पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीत हनुमंतप्पाने साक्षात् मृत्यूशी जी झुंज दिली, ती अजोड तर आहेच, पण आपल्या सहकार्यांच्या शोधार्थ लष्कराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जी अथक शोधमोहीम राबवली, तीही अतुलनीय म्हणावी लागेल. हिंमत न हरता आणि आशा न सोडता, बर्फाखाली गाडला गेलेल्या लष्करी ठाण्याचे नेमके ठिकाण शोधून काढणे, तेथील पंचवीस - तीस फूट साठलेला बर्फ मोजक्या उपकरणांनिशी स्वतः खराब हवामानाशी झुंज देत कापून काढणे आणि त्या ढिगार्याखाली जिवंत स्थितीत सापडलेल्या आपल्या सहकार्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याला तात्काळ दिल्लीला आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे सारेच खूप कठीण तरीही अत्यंत प्रशंसनीय काम आहे. सियाचीनमधील परिस्थिती किती खडतर आणि आपल्या भारतीय सैनिकांसाठी किती आव्हानात्मक आहे याचा वेध गेल्या शनिवारच्या अग्रलेखात आम्ही घेतला होता. परंतु एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही सियाचीनमधील ठाणी भारताने आपले आजवर आपले ८६९ जवान गमावूनही कायम राखलेली आहेत, यावरूनच त्यांचे संरक्षणदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात यावे. सियाचीनवरील गस्त हटवली तर काराकोरम पर्वतराजीची ती अत्युच्च हिमशिखरे पाकिस्तानच्या ताब्यात तर जातीलच, शिवाय बाल्टिस्तानातील पाक सेना आणि पलीकडील शक्सगाम खोर्यातील चिनी सेना यांच्यात समन्वय प्रस्थापित झाला तर भारतासाठी ते मोठे संकट ठरेल. म्हणूनच दिवसाला पाच ते सात कोटी रूपये खर्च येत असूनही सियाचीनच्या शिखरांवर भारताचा तिरंगा डौलाने फडकतो आहे. पाकिस्तानला समोरच्या सालतोरोच्या कमी उंचीच्या भागात त्याने रोखून धरलेले आहे. सियाचीन ही भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाचीही निशाणी आहे. तिथले २१,१५३ फूट उंचीचे सर्वोच्च ‘बाना’ ठाणे २४ जून १९८७ रोजी पाकिस्तानचे तेथील ठाणे, तीन दिवस अन्नपाण्याविना असताना बाराशे फूट खडी हिमभिंत दोरावरून चढून तिथल्या बंकरमधल्या आठ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करणार्या बानासिंगच्या पराक्रमाची गाथा सांगते आहे! सियाचीनमधील काही ठाणी तर आजही एवढी दुर्गम आहेत की तेथे जाण्यासाठी १२८ किलोमीटर अंतर कापण्यासाठी २८ दिवस चालावे लागते. सियाचीन ही भारतीय जवानांच्या पराक्रमाची यशोगाथा आहे. जेथे क्षणोक्षणी हिमदंश व्हायची भीती असते, विरळ प्राणवायूमुळे कधीही जिवावर बेतू शकते, दृष्टीनाशापासून श्रवणदोषापर्यंत काहीही होऊ शकते, अशा या जगातील सर्वोच्च उंचीच्या रणभूमीवर सहा दिवस, सहा रात्री बर्फाखाली पंचवीस तीस फूट, उणे पन्नास अंश तापमानात मृत्यूशी झुंज देत राहिलेल्या आपल्या जवळच्या धारवाड जिल्ह्यातल्या कुंदगोळ तालुक्यातल्या बेटादुर गावच्या या हनुमंतप्पापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते! त्याला वाचवण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, त्यांना त्याला जिवंत पाहताक्षणी साक्षात् बजरंगबलीचेच दर्शन घडल्यासारखे वाटले असेल यात शंका नाही. मृत्यूशी झुंज हा नेहमीच आशा -निराशेचा खेळ असतो. ज्या अत्यवस्थ स्थितीत त्याला बाहेर काढण्यात आले ते पाहता त्याचे प्राण वाचावेत यासाठी केवळ प्रार्थना करणेच आपल्या सार्यांच्या हातात आहे. अवघ्या देशाने हनुमंतप्पासाठी काल प्रार्थना केली असेल यात शंका नाही. जनसामान्यांच्या या कोटी कोटी सदिच्छांच्या बळावर बासष्टीतल्या बसण्णाला तिचा नातू, पत्नी महादेवीला तिचा पती आणि दीड वर्षाच्या नेत्राला तिचे बाबा पुन्हा भेटतील आणि त्यांची कोमेजलेली मने आनंदाने फुलतील अशी आशा करूया...
Subscribe to:
Posts (Atom)