Wednesday, February 24, 2016

मृत्युंजय

कधी कधी अशी एखादी बातमी कानी येते की नियती, दैव या गोष्टींवर विश्वास ठेवणे भाग पडते. बुद्धिप्रामाण्यवाद्यांचीही मती गुंग करणार्‍या अशा या घटना असतात. एखाद्या विद्ध्वंसक भूकंपात प्रचंड ढिगार्‍यांखालून एखादे अजाण बाळ अंगावर ओरखडाही नसलेल्या स्थितीत सापडते, एखाद्या भीषण अपघातातून कोणी खरचटल्याविना आश्चर्यकारकरीत्या बचावते, कोळशाच्या खाणीत गाडल्या गेलेल्या कामगारांपैकी एखादा सुदैवी अनेक दिवसांनंतरही जिवंत आढळतो, बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्‌ड्यात पडलेला मुलगा जिवंत बाहेर काढला जातो... आपली मती गुंग करणार्‍या अशा घटनांना केवळ चमत्कार म्हणणे मग भाग पडते. सियाचीन हिमस्खलन दुर्घटनेत पंचवीस फूट खोल बर्फात, उणे पन्नास अंश तापमानात गाडला गेलेला लान्स नायक हनुमंतप्पा कोप्पड तब्बल सहा दिवसांनी बेशुद्धावस्थेत, परंतु जिवंत स्थितीत सापडणे हा देखील केवळ चमत्कारच म्हणावा लागेल. अशा पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीत हनुमंतप्पाने साक्षात् मृत्यूशी जी झुंज दिली, ती अजोड तर आहेच, पण आपल्या सहकार्‍यांच्या शोधार्थ लष्कराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जी अथक शोधमोहीम राबवली, तीही अतुलनीय म्हणावी लागेल. हिंमत न हरता आणि आशा न सोडता, बर्फाखाली गाडला गेलेल्या लष्करी ठाण्याचे नेमके ठिकाण शोधून काढणे, तेथील पंचवीस - तीस फूट साठलेला बर्फ मोजक्या उपकरणांनिशी स्वतः खराब हवामानाशी झुंज देत कापून काढणे आणि त्या ढिगार्‍याखाली जिवंत स्थितीत सापडलेल्या आपल्या सहकार्‍याचे प्राण वाचवण्यासाठी त्याला तात्काळ दिल्लीला आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे सारेच खूप कठीण तरीही अत्यंत प्रशंसनीय काम आहे. सियाचीनमधील परिस्थिती किती खडतर आणि आपल्या भारतीय सैनिकांसाठी किती आव्हानात्मक आहे याचा वेध गेल्या शनिवारच्या अग्रलेखात आम्ही घेतला होता. परंतु एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही सियाचीनमधील ठाणी भारताने आपले आजवर आपले ८६९ जवान गमावूनही कायम राखलेली आहेत, यावरूनच त्यांचे संरक्षणदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात यावे. सियाचीनवरील गस्त हटवली तर काराकोरम पर्वतराजीची ती अत्युच्च हिमशिखरे पाकिस्तानच्या ताब्यात तर जातीलच, शिवाय बाल्टिस्तानातील पाक सेना आणि पलीकडील शक्सगाम खोर्‍यातील चिनी सेना यांच्यात समन्वय प्रस्थापित झाला तर भारतासाठी ते मोठे संकट ठरेल. म्हणूनच दिवसाला पाच ते सात कोटी रूपये खर्च येत असूनही सियाचीनच्या शिखरांवर भारताचा तिरंगा डौलाने फडकतो आहे. पाकिस्तानला समोरच्या सालतोरोच्या कमी उंचीच्या भागात त्याने रोखून धरलेले आहे. सियाचीन ही भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाचीही निशाणी आहे. तिथले २१,१५३ फूट उंचीचे सर्वोच्च ‘बाना’ ठाणे २४ जून १९८७ रोजी पाकिस्तानचे तेथील ठाणे, तीन दिवस अन्नपाण्याविना असताना बाराशे फूट खडी हिमभिंत दोरावरून चढून तिथल्या बंकरमधल्या आठ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करणार्‍या बानासिंगच्या पराक्रमाची गाथा सांगते आहे! सियाचीनमधील काही ठाणी तर आजही एवढी दुर्गम आहेत की तेथे जाण्यासाठी १२८ किलोमीटर अंतर कापण्यासाठी २८ दिवस चालावे लागते. सियाचीन ही भारतीय जवानांच्या पराक्रमाची यशोगाथा आहे. जेथे क्षणोक्षणी हिमदंश व्हायची भीती असते, विरळ प्राणवायूमुळे कधीही जिवावर बेतू शकते, दृष्टीनाशापासून श्रवणदोषापर्यंत काहीही होऊ शकते, अशा या जगातील सर्वोच्च उंचीच्या रणभूमीवर सहा दिवस, सहा रात्री बर्फाखाली पंचवीस तीस फूट, उणे पन्नास अंश तापमानात मृत्यूशी झुंज देत राहिलेल्या आपल्या जवळच्या धारवाड जिल्ह्यातल्या कुंदगोळ तालुक्यातल्या बेटादुर गावच्या या हनुमंतप्पापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते! त्याला वाचवण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, त्यांना त्याला जिवंत पाहताक्षणी साक्षात् बजरंगबलीचेच दर्शन घडल्यासारखे वाटले असेल यात शंका नाही. मृत्यूशी झुंज हा नेहमीच आशा -निराशेचा खेळ असतो. ज्या अत्यवस्थ स्थितीत त्याला बाहेर काढण्यात आले ते पाहता त्याचे प्राण वाचावेत यासाठी केवळ प्रार्थना करणेच आपल्या सार्‍यांच्या हातात आहे. अवघ्या देशाने हनुमंतप्पासाठी काल प्रार्थना केली असेल यात शंका नाही. जनसामान्यांच्या या कोटी कोटी सदिच्छांच्या बळावर बासष्टीतल्या बसण्णाला तिचा नातू, पत्नी महादेवीला तिचा पती आणि दीड वर्षाच्या नेत्राला तिचे बाबा पुन्हा भेटतील आणि त्यांची कोमेजलेली मने आनंदाने फुलतील अशी आशा करूया...

No comments:

Post a Comment