Wednesday, February 24, 2016

दात घशात

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काल संध्याकाळी लोकसभेत जेएनयू वादावरील चर्चेला उत्तर देताना केलेले भाषण हे त्यांचे आजवरच्या सांसदीय कारकिर्दीतील सर्वोत्तम भाषण होते. विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घालण्यासाठी त्यांनी या संधीचा पुरेपूर वापर केला. आधीच सभात्याग केलेला असल्याने त्यांच्या भाषणात अडथळा आणायला कॉंग्रेसजन वा डावे सभागृहात नव्हते. त्यामुळे आपल्या वक्तृत्वाची चौफेर फटकेबाजी करीत इराणी यांनी सरकारपक्षाचा किल्ला लढवला. नुसता लढवलाच नव्हे, तर सरही केला. जेएनयू प्रकरणाचे राजकारण करू पाहणार्‍या विरोधकांना एवढी जबर चपराक त्यांनी आपल्या भाषणातून दिली आहे की विरोधकांच्या हातचे बहुतेक मुद्दे एव्हाना पुरते निकामी झाले असतील. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेचा देशविरोधी घोषणाबाजीबद्दलचा अहवाल, विद्यापीठाने केलेली संबंधित विद्यार्थ्यांच्या निलंबनाची शिफारस आदी कागदपत्रे फडकावत भरभक्कम पुराव्यांनिशी त्यांनी आपली बाजू तर मांडलीच, परंतु डाव्या विचारसरणीच्या आडून पेरल्या जाणार्‍या हलाहलाचेही काही मासले आपल्या भाषणात दिले. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आव आणणार्‍यांना आता जेएनयू प्रकरणातील स्वतःच्या भूमिका पुन्हा तपासाव्या लागतील. इराणी यांनी रोहित वेमुला प्रकरणापासून जेएनयू प्रकरणापर्यंत वादांशी संबंधित असलेले सर्वजण कॉंग्रेस सरकारच्याच काळात नियुक्त झालेले होते हे त्यांनी वारंवार नमूद केले आणि कॉंग्रेसच्या भात्यातील तीर निकामी होत गेले. भाषणादरम्यान त्या भावूक झाल्या. रोहित वेमुला प्रकरणाचे कसे राजकारण झाले तेही त्यांनी दाखवून दिले. संसदेतील या संस्मरणीय भाषणाने या दोन्ही प्रकरणांत सत्ताधारी भाजपला घेरण्याचे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत. दुसरीकडे, अमित शहा यांनीही राहुल गांधी यांना आपण देशद्रोही घोषणाबाजींना पाठिंबा देता का असा थेट सवाल केलेला आहे. म्हणजेच देशभक्ती आणि देशद्रोहाचा जो वाद सध्या उफाळला आहे, त्यात बचावात्मकता न स्वीकारता अत्यंत आक्रमकपणे सत्ताधारी भाजपा जनमत स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्नरत असल्याचे दिसते आहे. विरोधकांच्या टीकेने खच्ची न होता या टीकेचेच रूपांतर जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपने खुबीने केले आहे. त्यामुळे विरोधक हे विषय जेवढे तापवतील, तेवढा सत्ताधारी भाजपला त्यात राजकीयदृष्ट्या फायदाच आहे. वास्तविक, अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ च्या वायद्यांचे काय झाले त्याचा हिशेब मागण्याची संधी विरोधकांना होती. जनतेच्या आशा - आकांक्षांची अद्याप पूर्तता झालेली नसल्याने त्या आघाडीवर विरोधकांना सत्ताधार्‍यांना घेरता आले असते. परंतु त्याऐवजी असे भावनिक विषय ऐरणीवर आणून विरोधकांनी आपल्याच पायांवर कुर्‍हाड मारून घेतली आहे. हे वाद भाजपाच्याच पथ्थ्यावर पडले आहेत. ‘अच्छे दिन’ संदर्भात केलेल्या वायद्यांच्या पूर्ततेत अद्याप आलेले अपयश, केवळ कागदावर राहिलेल्या मोठमोठ्या योजना आणि घोषणा, काही केंद्रीय मंत्र्यांची निष्क्रियता असे सगळे विषय आपोआप पिछाडीवर गेले आहेत आणि विरोधकांनी जे विषय समोर आणले ते विरोधकांवरच उलटवीत भाजपाने आक्रमक प्रत्युत्तराद्वारे विरोधकांना ते अफझल गुरूचा उदोउदो करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांची साथ करीत आहेत असे चित्र लीलया निर्माण केले आहे. जेएनयू प्रकरणात अतिउत्साह दाखविणारे राहुल गांधी स्वतःच निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकले. त्यांच्या नेतृत्वाच्या परिपक्वतेविषयी देशाला अद्यापही साशंकता आहे आणि भले सर्वेक्षणांतून त्याविषयी भलता विश्वास व्यक्त केला जात असला, तरी ज्या प्रकारे कॉंग्रेसचे मुद्दे सत्ताधारी भाजपाने त्यांच्यावरच उलटवले, ते पाहिल्यास, राहुल यांना अजून बरेच काही शिकायचे आहे हे मात्र स्पष्ट होते. विरोधकांची सभात्यागाची कालची चुकलेली रणनीती स्मृती इराणींच्या पथ्थ्यावर पडली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवीत त्यांनी समस्त दूरचित्रवाणी वाहिन्यांचा ‘प्राईम टाइम’ काबीज केला. त्यामुळे विरोधकांची कालची रणनीती कशी फसली त्याचा हिशेब राहुल यांनी जरूर मांडावा. आज रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. येत्या सोमवारी अर्थसंकल्प मांडला जाईल. सरकारच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा विरोधक सरकारपाशी मागणार आहेत की नाही? की रोहित वेमुला किंवा जेएनयू प्रकरणासारख्या भावनिक मुद्द्यांवर वितंडवाद घालीत भाजपालाच अप्रत्यक्ष लाभ मिळवून देणार आहेत?

No comments:

Post a Comment