Wednesday, February 24, 2016

वाचा बसली?


गुजरातमध्ये १५ जून २००४ रोजी तिघा दहशतवाद्यांसमवेत चकमकीत मारली गेलेली इशरतजहॉं ही देखील दहशतवादीच होती आणि लष्कर ए तोयबाची ती फिदायीन म्हणजे आत्मघाती साथीदार होती, याचा पुनरूच्चार डेव्हीड कोलमन हेडलीने काल आपल्या जबानीत केला. ‘पुनरूच्चार’ म्हणण्याचे कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी हेडली शिकागोत पकडला गेल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक अमेरिकेत मुंबई हल्ल्यासंदर्भात त्याच्या चौकशीसाठी गेले होते, तेव्हाही हेडलीने इशरतजहॉं ही ‘लष्कर’ ची दहशतवादी असल्याचे सांगितले होते, पण तेव्हा भारतात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते आणि गुजरात दंगलीनंतर तापलेल्या तव्यावर इशरतजहॉं प्रकरण हे गुजरातमधील तत्कालीन मोदी सरकारविरुद्धचे एक ब्रह्मास्त्र म्हणून वापरता येत असल्याने सीबीआयने हेडलीच्या त्या गौप्यस्फोटाला ‘ऐकीव माहिती’ म्हणून निकाली काढले होते. आजवर इशरतजहॉंचे गुणगान करीत आलेल्या आणि ‘मानवतावादा’चा बुरखा घेतलेल्या देशद्रोह्यांचे डेव्हीडच्या ताज्या जबानीवर काय म्हणणे आहे? गेली अकरा वर्षे इशरतजहॉं चकमक प्रकरणाचे जे पराकोटीचे राजकारण झाले, गुजरातच्या पोलिसांचे, गुप्तचर यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रयत्न झाले, त्याची जबाबदारी आता कोण घेणार आहे? इशरतजहॉंसोबत मारले गेलेले तिघे तरूण हे दहशतवादी होते हे तर यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. ती ज्याची सहायक म्हणून काम करायची, तो जावेद गुलाम शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई हा लष्कर ए तोयबासाठी काम करायचा याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत. लष्कर ए तोयबाच्या म्होरक्याशी त्याच्या झालेल्या संभाषणाची ध्वनीफीत काही वर्षांपूर्वी ‘हेडलाइन्स टुडे’ ने जारी केली होती. प्रणेश हा मूळचा केरळी हिंदू. साजिदा या मुलीशी त्याने लग्न केले तेव्हा त्याचे धर्मांतर केले गेले. त्याला ‘लष्कर’ च्या जाळ्यात अडकवले गेले. आपण जावेदला जिहादी प्रशिक्षणासाठी पाठवल्याची कबुली दिल्ली पोलिसांनी २००५ साली पकडलेल्या महंमद रझाक या दहशतवाद्याने दिली होती. चकमकीत मारला गेलेला अमजद अली राणा हा तर पाकिस्तानी दहशतवादी होता. त्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करण्यात काही काश्मिरींनी मदत केल्याचे सिद्ध झाले होते. फैजाबादच्या महंमद वासी याने या टोळक्याला पिस्तुल स्टेनगन पुरवल्याची कबुली दिली होती. वास्तविक इशरतजहॉं ही देखील ‘लष्कर’ शी संबंधित असल्याची कबुली २००४ साली त्या दहशतवादी संघटनेच्याच ‘गझवा टाइम्स’ या लाहोरच्या नियतकालिकाने दिली होती. पण भारतात तिच्या हत्येचे राजकारण रंगताच जमात उद दावाने हात झटकले. पण इशरतजहॉं ही दहशतवादी असल्याचे ‘लष्कर’ पासून हेडलीपर्यंत सर्व संबंधित सांगत असूनही सीबीआयने तेव्हा जाणूनबुजून त्या आघाड्यांवर तपास करणे टाळले. त्यामागे अर्थातच सीबीआयची सूत्रे हलवणारे केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असावे. जावेद, अहमद, झीशान जौहर आणि इशरत ही चौघेही गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या मोहिमेवर निघाल्याची खबर गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती आणि त्या आधारेच गुजरात पोलिसांनी कारवाई केली होती. कोटरपूर - अहमदाबादेत झालेली ती चकमक खरी की त्यांना टोलबूथवरून आधल्या दिवशीच ताब्यात घेतले होते हा सीबीआयचा दावा खरा हा वेगळा विषय; परंतु इशरतजहॉंच्या ‘लष्कर’ शी असलेल्या संबंधांच्या खोलात शिरायचे मात्र सीबीआयने संयुक्त पुरोगामी आघाडीच्या ‘राजकीय’ सोयीसाठी चतुराईने टाळले होते हे वास्तव पुन्हा एकवार ढळढळीतपणे समोर आले आहे. इशरतजहॉंच्या निरपराधित्वाचे दाखले देत आलेल्या आणि तिला ‘हुतात्मा’ संबोधणार्‍या तमाम मंडळींचे भांडे हेडलीच्या या पुनरूच्चाराने फुटले आहे. आधी तिघा ‘निरपराध’ तरूणांना चकमकीत मारल्याची आवई त्यांनी उठवली. नंतर इशरतबरोबरचे तिघे दहशतवादी असल्याचे सिद्ध होताच इशरतच्या निरपराधित्वाची ओरड झाली. आता इशरत हीही दहशतवादी असल्याचा पुनरूच्चार हेडलीने केल्याने या मंडळींची आता वाचाच बसली असेल. इशरतजहॉं प्रकरणाचे भांडवल करून ज्यांनी एवढी वर्षे आरडाओरडा केला, गुजरात पोलिसांचे मनोधैर्य खच्ची केले, चकमकीशी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना गजांआड व्हायला लावले, गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांविरुद्ध आरोप केले, त्यांनी आणि त्यांच्या राजकीय  पाठिराख्यांनी आता देशाची जाहीर माफी मागायला हवी. राष्ट्रहित म्हणून काही चीज असते आणि ती सर्वोच्च असते याची जाणीव निदान एवढ्या बुरखेफाडीनंतर त्यांना होईल अशी आशा आहे.

No comments:

Post a Comment