Wednesday, February 24, 2016

स्वबळ?

कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजयसिंग यांनी आपल्या गोवा भेटीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला निशाणा करीत त्या पक्षाचे नेते स्वार्थी व सत्तालोलुप असल्याचा आरोप केला. एकीकडे मगो पक्ष सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी असलेल्या आपल्या युतीबाबत फेरविचार करीत असल्याचे संकेत देत असताना दुसरीकडे सिंग यांनी त्या पक्षाशी संभाव्य हातमिळवणीची शक्यता स्वतःहून संपुष्टात आणण्यामागचे तर्कशास्त्र अनाकलनीय आहे. वास्तविक सिंग यांना मगोला लक्ष्य करण्याचे काही कारण नव्हते. त्यापेक्षा त्यांचा भर स्वतःच्या ढेपाळलेल्या पक्षाच्या पुनर्उभारणीवर असता तर ते अधिक संयुक्तिक दिसले असते. परंतु सिंग यांनी अशा काही टेचात मगो आणि स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कोरडे ओढले की जणू काही हे दोन्ही पक्ष कॉंग्रेसशी युती करण्यासाठी रांग लावूनच उभे आहेत! कॉंग्रेसची राज्यातील विद्यमान दारूण स्थिती पाहता खरे तर अशा प्रकारच्या युती वा आघाडीचा विचार कॉंग्रेसनेच करायला हवा होता. परंतु दिग्विजयसिंग यांनी ‘एकला चलो रे’ चे संकेत देत पक्षाच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. अर्थात, कॉंग्रेसची एकूण नीती पाहता, आजची त्यांची ही भूमिका निवडणूक जवळ येताच कायम असेल असे नाही. शेवटी हे राजकारण आहे आणि त्याची समिकरणे सतत उलटीपालटी होत असतात. मगोवर उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचा आरोप जरी दिग्विजयसिंग करीत असले, तरी वास्तवित उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचे धोरण जवळजवळ सगळेच राजकीय पक्ष अवलंबित असतात. विचारधारा, भूमिका अलगद बासनात गुंडाळून ठेवल्या जातात. कॉंग्रेसही त्याला अपवाद नाही. विविध राज्यांमध्ये युती आणि आघाड्यांबाबत वेळोवेळी पक्षाची बदलत गेलेली भूमिका याची साक्ष देईल. त्यामुळे सिंग यांनी मगोला हिणवण्यात काही अर्थ नाही. प्रश्न आहे तो कॉंग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवायला समर्थ आहे का? ज्या पक्षाला पणजी महापालिकेची निवडणूक लढवायला सर्व प्रभागांमध्ये उमेदवार सापडू शकले नाहीत, पक्ष समित्यांवरील पदे भरायला उमेदवार मिळत नाहीत, त्यांनी स्वबळावर विधानसभेच्या सर्वच्या सर्व चाळीस जागा लढवण्याची भाषा करणे अतिआत्मविश्वास दाखवण्यासारखे आहे. राज्यातील राजकीय समिकरणे बदलू लागली आहेत. वास्तविक सरकारला अडचणीत आणणारे जे मुद्दे कॉंग्रेसने उचलायला हवे होते, ते गोवा फॉरवर्डसारखा नवा पक्ष प्रभावीपणे उचलू लागला आहे. अशा वेळी आपल्या पक्षाचे झेंडे घेऊन त्यांच्या आंदोलनात सामील व्हा असे सांगण्याची पाळी दिग्विजयसिंहावर यावी ही परिस्थिती केविलवाणी आहे. राज्यातील भाजप सरकारविरूद्ध भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रणशिंग फुंकलेले आहे. भाजपचा ‘माज उतरवू’ अशी टोकाची भाषा संघ नेते करीत आहेत. अशा वेळी माध्यम प्रश्न, कॅसिनो, माडांसंबंधीची कायदा दुरूस्ती, कूळ - मुंडकारांसंबंधीची कायदा दुरूस्ती असे ज्वलंत विषय कॉंग्रेसला हाती घेऊन सरकारविरूद्ध रान पेटवता आले असते. परंतु कॉंग्रेस आमदारांची सरकारविरूद्ध ब्र काढण्याची हिंमत दिसत नाही. बाबूश मोन्सेर्रात तर उघडउघड पक्षाविरोधात उभे राहिले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने ‘कारवाई’ केली. पण इतरांनी अंगिकारलेले सरकारप्रतीचे सौम्य धोरण दिसत असूनही त्याविरुद्ध कारवाई करण्याची पक्षाची हिंमत दिसत नाही. खुद्द प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांना हे पद डोईजड झालेले दिसते. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरुद्ध समस्त विरोधकांना एकत्र आणून संघटितपणे आव्हान उभे करण्याची संधी कॉंग्रेसला होती, परंतु दिग्विजयसिंग यांनी आपल्या वाचाळ स्वभावाने ती  शक्यता आधीच घालवून टाकली आहे. त्यातून पक्षाचे काय भले होईल ते तेच जाणोत. वायफळ विधाने करण्याऐवजी त्यांनी आपली शक्ती पक्षसंघटना बळकट करण्यात खर्च केली, तरच गेल्या विधानसभा निवडणुकीत पुरत्या गलितगात्र झालेल्या पक्षाची पुनर्उभारणी शक्य आहे. मुळात पक्ष कार्यकत्यार्र्ंनी गमावलेला आत्मविश्वास त्यांना पुन्हा प्राप्त करून देण्यात नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावायला हवी. परंतु येथे तर नेत्यांनीच आपला आत्मविश्वास गमावलेला दिसतो आहे. वास्तविक, पणजी महापालिकेची निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी असल्याचे चित्र निर्माण करून कॉंग्रेसला तेथे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपड करता आली असती. परंतु त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा आत्मविश्वासच पक्षात दिसला नाही. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठीचा आत्मविश्वास तरी पक्षाला गवसेल काय?

No comments:

Post a Comment