Wednesday, February 24, 2016

फितूर


सियाचीनमध्ये पंचवीस फूट बर्फाखालून वर काढण्यात आलेल्या हनुमंतप्पा कोप्पडचे प्राण वाचावेत यासाठी अवघा देश प्रार्थना करीत असताना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये संसद हल्ल्याप्रकरणी फाशी गेलेल्या अफझल गुरूच्या ‘हौतात्म्या’ चे स्मरण चालले होते. दिल्लीच्या प्रेस क्लबमध्येही काश्मीरच्या ‘आझादी’ चे नारे लावले गेले. आपल्या देशाच्या लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा सरेआम गैरवापर तर आहेच, परंतु सियाचीनमध्ये आपले सैनिक शहीद झाल्याने हळहळणार्‍या देशाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. परंतु एवढे सरळसरळ देशद्रोही कृत्य होऊनही स्वतःला राष्ट्रनिष्ठ म्हणवणार्‍या केंद्रातील भाजप सरकारची भूमिका मात्र फारच मवाळ आणि बोटचेपेपणाची दिसली. महेश गिरी या खासदाराने तक्रार नोंदवल्यावर आता कुठे देशद्रोहाचा गुन्हा तोही ‘अज्ञात’ विद्याथ्यार्र्ंविरूद्ध नोंदवला गेला आहे. ज्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अफझल गुरूचा उदोउदो केला गेला, त्याला दंडवत घातले गेले, त्याच्या कुलगुरूंनीही आयोजकांविरुद्ध केवळ ‘शिस्तभंगा’संदर्भात चौकशी लावली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यासंदर्भात आवाज उठवला त्यालाच विरोध दर्शवीत हा विरोध म्हणजे जेएनयूच्या ‘लोकशाही परंपरे’वरील हल्ला असल्याची अजब भूमिका घेतली आहे. मुळात जेएनयूला नाव जवाहरलाल नेहरूंचे असले तरी गेली अनेक वर्षे तो नक्षलवाद्यांच्या आणि काश्मिरी फुटिरांच्या पांढरपेशा समर्थकांचा अड्डा बनलेला आहे. तेथील विद्यार्थी संघटनेवरही डाव्या विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व आहे. विद्यापीठामध्ये सरळसरळ देशद्रोही कृत्ये होत असताना त्याला विरोध करण्याऐवजी त्यांनी त्याचे अप्रत्यक्ष समर्थनच चालवले. वास्तविक, या प्रकरणामध्ये विद्यापीठ प्रशासनाची बेफिकिरी अधिक दिसते. ‘सांस्कृतिक कार्यक्रमा’ च्या नावाखाली विद्यापीठ संकुलामध्ये कोण काय आयोजित करते आहे याचा थांगपत्ताही प्रशासनाला अभाविपने विरोध दर्शवीपर्यंत नव्हता. अभाविपने विरोध करण्याआधी खरे तर विद्यापीठाने स्वतःहून सदर कार्यक्रमाला प्रतिबंध करायला हवा होता. परंतु केवळ परवानगी नाकारण्याचा सोपस्कार करून विद्यापीठ प्रशासन मोकळे राहिले. त्यामुळे अफझल गुरूचा उदो उदो तर झालाच, शिवाय ‘कश्मीर की आझादी तक, जंग रहेगी, जंग रहेगी’ चे नारेही दिले गेले. हैदराबादच्या विद्यापीठामध्ये रोहित वेमुलाचा दुर्दैवी बळी गेला, परंतु त्याच्यावर कारवाई झाली होती ती याकूब मेमनला फाशी देण्याविरुद्ध केलेल्या निदर्शनांमुळे. देशातील विद्यापीठांमधून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर देशद्रोही कृत्यांना थारा मिळणार असेल, तर या देशाचे पुढे काय होईल याची कल्पनाही करवत नाही. दहशतवाद्यांना उच्चशिक्षित तरुण जाऊन मिळण्याचे प्रमाण वाढले आहे, त्याला काही विद्यापीठांमधील चिथावणीखोर वातावरणाची पार्श्‍वभूमी आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. अफझल गुरूचे गोडवे गाण्याचे कारणच काय? प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर तो फासावर गेला. पण त्याच्यावर अरुंधती रॉयबाईंनी पुस्तक लिहिले. उद्या कदाचित अजमल कसाबलाही त्या ‘शहीद’ ठरवतील! या देशाला दहशतवादाच्या ज्वालामुखीवर आणून ठेवण्यास कोण कोण कारणीभूत आहे, याचा हिशेब कधी तरी करावा लागणार आहे. या देशात प्रत्येक विचारधारेला मुक्त वाव आहे. पण याचा अर्थ कोणी देशद्रोह्यांचे अवास्तव समर्थन करावे असा नाही. परंतु आपल्याकडे हे होते आणि चालवूनही घेतले जाते. असे लोक येथे ‘विचारवंत’ ठरतात! काश्मिरी तरुणांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पुण्याची ‘सरहद’ सारखी संघटना गेली अनेक वर्षे काम करते आहे. याउलट दुसरीकडे देशातील तरुणांमध्ये अराष्ट्रीय वृत्तीचे बीजारोपण करण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटना वावरताना दिसत आहेत. दिल्ली प्रेस क्लबमध्ये जिथे आझादीचे नारे घुमले त्या कार्यक्रमाचे आयोजन दिल्ली विद्यापीठाच्या अली जफर या प्राध्यापकाने केले होते आणि तेथे एसएआर गिलानी या दुसर्‍या प्राध्यापकाने प्रक्षोभक भाषण केले. हे असले प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देत असतील? सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘फितूर’ नावाचा एक चित्रपट सुरू आहे. देशात राहून देशाचे अन्न खाऊन देशाशी गद्दारी करणारे फितूर हे आज या देशापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशद्रोह यातील सीमारेषा ठळकपणे दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे. सरकारला खरोखर राष्ट्रहित सर्वोच्च असेल तर जेथे जेथे देशाशी गद्दारी केली जाते, तेथे खंबीरपणे कारवाई व्हावी लागेल. देशद्रोहाला क्षमा नाही!

No comments:

Post a Comment